मोदींच्या कॅबिनेटमध्ये कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदं? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 02:45 PM2019-05-28T14:45:50+5:302019-05-28T14:48:54+5:30
मोदींच्या मंत्रिमंडळाबद्दल मोठी उत्सुकता
नवी दिल्ली: नरेंद्र मोदी 30 मे रोजी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत काही मंत्रीदेखील शपथ घेतील. त्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळात कोणा कोणाला स्थान मिळणार, कोणत्या खासदाराला कोणतं मंत्रिमंडळ दिलं जाणार याची चर्चा रंगू लागली आहे. यासोबतच एनडीएतील घटक पक्षांना किती मंत्रीपदं दिली जाणार, याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
2014 मध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर मोदींनी सर्व मंत्र्यांची नावं जाहीर केली नव्हती. यंदाही मंत्र्यांची नावं जाहीर होण्याची शक्यता कमीच आहे. यंदा एनडीएतील पक्षांची संख्या कमी असून प्रादेशिक पक्षांची कामगिरीदेखील चांगली झाली आहे. त्यामुळेच या पक्षांना मंत्रिमंडळात प्राधान्य दिलं जाऊ शकतं. याशिवाय मोदींच्या कॅबिनेटमध्ये 2 किंवा 3 महिला असू शकतात. एनडीएनं यंदा 353 जागा जिंकल्या आहेत. यातील 303 जागा भाजपाच्या आहेत.
पक्ष संभाव्य मंत्री
भाजपा 45+
शिवसेना 3-4
जदयू 3-4
लोजपा 1
आरएलपी 1
आजसू 1
अपना दल 1
अकाली दल 1
जातीय समीकरण, प्रादेशिक गणितं आणि येत्या निवडणुका महत्त्वाच्या
2019 मध्ये हरियाणा, झारखंड आणि महाराष्ट्रात निवडणूक आहे. तर दिल्ली, बिहार आणि पुद्दुचेरीत 2020 मध्ये निवडणूक होईल. हरियाणात गुर्जरांचं प्रमाण जास्त असल्यानं कृष्ण पाल गुर्जर यांना मंत्रीपद दिलं जाऊ शकतं. महाराष्ट्रात शिवसेनेची कामगिरी झाली आहे. याशिवाय विधानसभेची निवडणूकदेखील जवळ आली असल्यानं शिवसेनेला 3-4 मंत्रीपदं दिली जाऊ शकतात. झारखंडमध्येही निवडणूक होणार असल्यानं ऑल झारखंड स्टुडंट्स युनियनच्या खासदाराला मंत्रीपद दिलं जाऊ शकतं. पुढील वर्षी बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे एनडीएचा घटकपक्ष असलेल्या आणि 17 पैकी 16 जागांवर विजयी झालेल्या संयुक्त जनता दलाला 3-4 मंत्रीपद मिळू शकतात. राजस्थानातील आरएलपीच्या एकमेव खासदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं.