इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वीच JDU ने केली उमेदवारांची घोषणा, नितीश कुमारांची नाराजी कायम?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 05:09 PM2024-01-03T17:09:56+5:302024-01-03T17:10:41+5:30
Lok Sabha Election 2024: सध्या इंडिया आघाडीमध्ये नितीश कुमार यांनी एक मोठा निर्णय घेत लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या काही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्यासाठी काँग्रेससह देशातील विविध विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. मात्र या आघाडीत अनेक मुद्द्यांवर अद्याप एकवाक्यता होऊ शकलेली नाही. त्यातच इंडिया आघाडीतील जागावाटपही अद्याप अडलेलं आहे. आज होणारी इंडिया आघाडी इंडिया आघाडीतील नेत्यांची व्हर्च्युअल बैठकही टळली आहे. सध्या नाराज असलेल्या नितीश कु्मार यांची समजूत काढण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आलेली होती. दरम्यान, ही बैठक टळल्यानंतर आता नितीश कुमार यांनी एक मोठा निर्णय घेत लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या काही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी जेडीयूने आपल्या उमेदवारांच्या नावांना अंतिम रूप देण्यास सुरुवात केली आहे. तसेच जेडीयूकडून आज एका उमेदवाराच्या नावाची घोषणाही करण्यात आली आहे. जेडीयूने अरुणाचल प्रदेशमधील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रूही तांगुंग यांच्या नावाची अरुणाचल प्रदेश पश्चिम लोकसभा मतदारसंघामधून उमेदवार म्हणून घोषणा केली आहे.
जेडीयूचे आमदार आणि पक्षाचे सरचिटणीस अफाफ अहमद खान यांनी बुधवारी रूही तांगुंग यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, २०२४ ची लोकसभेची निवडणूक जवळ आलेली आहे. जनता दल युनायटेड पक्ष लोकसभा निवडणुकीबरोबरच होणारी अरुणाचल प्रदेश विधानसभेची निवडणुकही लढणार आहे. ही घोषणा पक्षाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी दिलेल्या आदेशांनुसार करण्यात येत आहे. त्यानुसारच रूही तांगूंग यांना अरुणाचल पश्चिम लोकसभा मतदारसंघामधून जनता दल युनायटेड पक्षाकडून उमेदवारी दिली जात आहे.
त्याबरोबरच लोकसभा निवडणुकीसाठी नितीश कुमार यांनी बिहार विधान परिषदेचे उपसभापती देवेशचंद्र ठाकूर यांना सीतामढी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास अनुकूतला दर्शवली आहे. त्यामुळे देवेशचंद्र ठाकूर आणि रूही तांगूंग यांच्या रूपात जेडीयूने दोन उमेदवार निश्चित केले आहेत.