Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 01:40 PM2024-10-05T13:40:22+5:302024-10-05T13:40:43+5:30

जदयूच्या मागणीला भाजपनेही पाठिंबा दर्शवला.

jdu demanded that Bihar Chief Minister Nitish Kumar should be awarded Bharat Ratna by the Government of India | Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा

Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा

nitish kumar news : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी जनता दल युनायटेडच्या समर्थकांनी केली. बिहारमध्ये आज जदयूची राज्य कारकारिणीची बैठक होत आहे. अशातच राजधानी पाटणा येथील जदयूच्या प्रदेश कार्यालयाबाहेरील पोस्टर चर्चेत आहे. नितीश कुमारांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी जदयूच्या सर्व नेत्यांच्या वतीने करण्यात आली आहे. जदयूचे सरचिटणीस छोटू सिंह यांनी हे पोस्टर लावले आहे.

"नितीश कुमार यांनी जगभरात नाव कमावले आहे. शीख समुदायाचे लोक नितीश कुमार यांचे कौतुक करतात. अमेरिका असो, ब्रिटन असो वा कॅनडा, सर्वांनीच नितीश कुमार यांच्या कामाचे कौतुक केले आहे. बिहारच्या विकासात त्यांनी बजावलेल्या भूमिकेसाठी नितीश कुमार यांना भारतरत्न मिळावा", अशी मागणी असल्याचे सरचिटणीस छोटू सिंह म्हणाले. तसेच आम्ही राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतही आमच्या भावना व्यक्त करू. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी केलेले काम ऐतिहासिक आहे. आम्ही आमच्या मागण्या भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यासमोर मांडू आणि गरज पडल्यास आम्ही दिल्लीत जाऊन आमच्या मागण्या जोरदारपणे मांडू, असेही त्यांनी सांगितले. 

नितीश यांना भारतरत्न देण्याची मागणी 
दरम्यान, जदयूसोबत बिहारमध्ये सरकारमध्ये असलेल्या भाजपने देखील नितीश कुमार यांना भारतरत्न द्यायला हवा या मागणीला पाठिंबा दिला. भाजपचे प्रवक्ते नीरज कुमार म्हणाले की, जदयूने मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी केली, यात चुकीचे काय आहे. नितीश कुमार यांनी भाजपसोबत येऊन जंगलराज असलेल्या बिहारमध्ये सुशासन प्रस्थापित केले. अंधारात असलेल्या बिहारला प्रकाशात आणण्याचे काम केले. जिथे चालण्यासाठी रस्ते नव्हते तिथे आमच्या सरकारच्या मदतीने पूल आणि रस्ते बांधले. त्यामुळे या मागणीला आमचा कोणताही आक्षेप नाही.

Web Title: jdu demanded that Bihar Chief Minister Nitish Kumar should be awarded Bharat Ratna by the Government of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.