प्रशांत किशोर, पवन वर्मा यांची जेडीयूतून हकालपट्टी; नितीश कुमारांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 05:05 AM2020-01-30T05:05:58+5:302020-01-30T05:10:01+5:30
प्रशांत किशोर आणि पवन वर्मा दोघांनी पक्षाच्या निर्णयाविरुद्ध, तसेच कार्यपद्धतीविरुद्ध वर्तन करुन पक्षाची शिस्त मोडली.
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्टÑीय लोकसंख्या नोंदणीचे (एनपीआर) समर्थन केल्याने बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांच्याविरुद्ध उघड टीका केल्याने जेडीयूचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर आणि सरचिटणीस पवन वर्मा यांची अखेर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
प्रशांत किशोर आणि पवन वर्मा दोघांनी पक्षाच्या निर्णयाविरुद्ध, तसेच कार्यपद्धतीविरुद्ध वर्तन करुन पक्षाची शिस्त मोडली. त्याच्या एकूणच पक्षविरोधी वर्तन पाहता दोघांनाही पक्षाची शिस्त पाळायची नाही, असे जेडीयूचे मुख्य सरचिटणीस के.सी. त्यागी यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. प्रशांत किशोर हे मुख्यमंत्र्यांविरुद्ध अपमानजनक शब्द वापरल्याचा आरोपही जेडीयूने केला आहे.
मंगळवारी नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांच्या टीकेची निंदा करताना म्हटले होते की, भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरून किशोर यांना पक्षात सामील केले होते. यावरून प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार खोटे बोलत असल्याचा आरोप केला.
पक्षाची प्रतिष्ठा खालावू नये म्हणून किशोर यांची पक्षातून हकालपट्टी करणे जरूरी आहे, असे जेडीयूने म्हटले आहे.
किशोर यांंचा नितीश कुमारांवर निशाणा
जेडीयूतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर प्रशांत किशोर यांनी जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला. बिहारच्या मुख्यमंत्रीपदी कायम राहोत, यासाठी किशोर यांनी नितीश कुमार यांना शुभेच्छा दिल्या. धन्यवाद नितीशजी! आपण बिहारच्या मुख्यमंत्रीपदी
राहोत, यासाठी शुभेच्छा. ईश्वर आपले भले करो, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.