बिहारमध्ये JDU तर कर्नाटकात JDS नं दिलं भाजपाला टेन्शन; नरेंद्र मोदी अडचणीत येणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 06:22 PM2024-08-01T18:22:34+5:302024-08-01T18:24:14+5:30
कर्नाटकात काँग्रेसनं खेळ केला, राजकीय डावपेचात जेडीएस - भाजपात दरी पडण्याची शक्यता
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या २ महिन्यातच एनडीएत कुरघोडी सुरु झाल्याचं चित्र आहे. भाजपा आणि घटक पक्ष जेडीएस यांच्यात खटके उडायला सुरुवात झालीय. एचडी कुमारस्वामी यांनी कर्नाटकातील सिद्धरमैय्या सरकार यांच्याविरोधात एनडीएच्या प्रस्तावित पदयात्रेतून काढता पाय घेतला आहे. भाजपा जेडीएसला समजावण्याचा प्रयत्न करत आहे. गुरुवारी कर्नाटक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट झाली.
दुसरीकडे नितीश कुमार यांच्या जेडीयूबाबतही चर्चा सुरू झाल्यात. बिहारमधील काँग्रेसच्या एका आमदाराने नितीश कुमार लवकरच इंडिया आघाडीसोबत येतील असा दावा केला आहे. एनडीएतील या घडामोडींमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा तिसरा कार्यकाळ पूर्ण करतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्नाटकातील कथित घोटाळ्यांबाबत एनडीएकडून काँग्रेसच्या सिद्धरमैय्या सरकारविरोधात पदयात्रा काढली जाणार आहे.
म्हैसूर अर्बन डेवलपमेंट अथॉरिटीत झालेल्या घोटाळ्यावर मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांच्यावर राजीनामा देण्याचा दबाव आहे. त्यासाठी भाजपानं पुढाकार घेत एनडीएकडून ३ ऑगस्टपासून ७ दिवस राज्यात पदयात्रा काढण्याचं आयोजित केले आहे. आता जेडीएस नेते आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी या पदयात्रेत त्यांचा पक्ष सहभागी नसेल अशी घोषणा केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे ही पदयात्रा होणार की नाही असा सवाल उभा राहिला आहे.
कुमारस्वामी नाराज का?
हसनचे भाजपा आमदार प्रीतम गौडा यांना जास्त महत्त्व का दिलं जात आहे यावरून एचडी कुमारस्वामी संतापले आहेत. या प्रकरणावरील त्यांची वेदना बुधवारी उघडपणे समोर आली. ते म्हणाले की, 'देवेगौडा कुटुंबात विष पेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीसोबत (प्रीतम गौडा) आम्ही एकाच व्यासपीठावर कसे येऊ शकतो?. पेनड्राइव्हचे वाटप कुणी केले हे आम्हाला माहित नाही का? असं सांगत भाजपावर चर्चा न करता पदयात्रेचे नियोजन केल्याचा आरोप त्यांनी केला. 'बंगळुरू ते म्हैसूरपर्यंत जेडीएस मजबूत आहे. आमच्याशी चर्चा न करता तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष कसे करू शकता किंवा असा निर्णय कसा घेऊ शकता? हा प्रश्न कुमारस्वामींनी भाजपाला विचारला आहे.
कुमारस्वामी यांनी त्यांचा पुतण्या प्रज्वल रेवन्ना याच्या सीडी घोटाळ्यात प्रीतम गौडाची भूमिका अधोरेखित केली. लोकसभा निवडणुकीदरम्यान रेवन्ना यांच्या सेक्स सीडी स्कँडलशी संबंधित व्हिडिओ क्लिपने भरलेल्या पेनड्राइव्हचे वाटप करण्यासाठी हसनचे आमदार गौडा यांना जबाबदार धरलं आहे. हसन लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी रेवन्नाच्या व्हिडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात वाटल्या गेल्या होत्या. यामुळे देवेगौडा कुटुंबाची मोठी बदनामी झाली. निवडणुकीचे निकाल आले तेव्हा रेवन्ना यांचा हसन लोकसभा जागेवर काँग्रेसकडून पराभव झाला. सध्या ते महिलांच्या लैंगिक शोषणाच्या एका प्रकरणात तुरुंगात आहे.