"...म्हणून मुस्लिमांची कामे करणार नाही"; नाश्ता करुन जा म्हणत खासदाराने व्यक्त केली नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 18:40 IST2024-06-17T18:38:07+5:302024-06-17T18:40:06+5:30
जेडीयूचे नवनिर्वाचित खासदार देवेशचंद्र ठाकूर सीतामढी लोकसभा मतदारसंघातील यादव आणि मुस्लिमांवर नाराजी व्यक्त केली.

"...म्हणून मुस्लिमांची कामे करणार नाही"; नाश्ता करुन जा म्हणत खासदाराने व्यक्त केली नाराजी
JDI MP Devesh Chandra Thakur : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात एनडीएचे सरकार स्थापन झालं असून नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेत. एनडीएमध्ये नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड या पक्षाचा देखील महत्त्वाचा वाटा आहे.त्यामुळे सत्ता स्थापनेत नितीश कुमार यांच्या पक्षाचे वजन जास्त होतं. मात्र आता नितीश कुमार यांच्या पक्षाच्या खासदाराने केलेल्या एका वक्तव्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मला मतदान केलं नाही म्हणून मी मुस्लिम आणि यादव समाजाची कामे करणार नाही असं जेडीयूच्या खासदाराने म्हटलं आहे. कमी मतांनी विजयी झालेल्या खासदाराने आपली नाराजी काम न करणार असल्याचे सांगून व्यक्त केली आहे.
"जेडीयूचे नवनिर्वाचित खासदार देवेशचंद्र ठाकूर यांनी सीतामढीतील एका कार्यक्रमादरम्यान मुस्लिम आणि यादवांसाठी कोणतेही काम करणार नसल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीत या समाजाची मते न मिळाल्यामुळे देवेशचंद्र ठाकूर दुखावले गेले होते. त्यामुळे देवेशचंद्र ठाकूर यांनी व्यासपीठावरुनच ही घोषणा केली.२२ वर्षे राजकारणात सक्रिय असताना यादव आणि मुस्लिम समाजासाठी सर्वाधिक काम केले. मात्र या लोकांनी विनाकारण मला या निवडणुकीत मतदान केले नाही," असे देवेशचंद्र ठाकूर म्हणाले.
"भविष्यात या समाजातील लोक कामासाठी आले तर त्यांना चहा-नाश्ता नक्कीच देईल पण त्यांची कामे करणार नाही. ज्यांना यायचे आहे, यावे, चहा-नाश्ता करून जावे पण मदतीची अपेक्षा करू नका. माझ्याकडे सर्वात जास्त वैयक्तिक काम कोणत्याही समाजाची झाली असतील तर ती मुस्लिम आणि यादव समाजाची आहेत. आम्ही भाजपशी संबंधित आहोत म्हणून तुम्ही आम्हाला मतदान करणार नाही का? तुम्हाला पंतप्रधान मोदींचा चेहरा दिसतो का? हे चुकीचे आहे. पंतप्रधान मोदींनी जात-धर्माचा विचार न करता सर्वांना धान्य दिले आहे," असेही देवेशचंद्र ठाकूर यांनी म्हटलं.
देवेशचंद्र ठाकूर यांनी सीतामढीमधून लोकसभा निवडणूक जिंकली आहे. देवेशचंद्र ठाकूर हे बिहार विधान परिषदेचे अध्यक्षही आहेत. यासोबत ठाकूर यांनी कुशवाह समाजावरही भाष्य केलं. "कुशवाह समाज इतका स्वार्थी झाला आहे का? या समाजाचे सरकारमध्ये भाजपचे एक उपमुख्यमंत्री आहेत, जर उपेंद्र कुशवाह विजयी झाले असते तर ते आज केंद्रीय मंत्री झाले असते, सीतामढीतील कुशवाह समाजाचे लोक काम करून घेण्यासाठी येतील का? त्यांची विचारसरणी किती विकृत झाली आहे," असे देवेशचंद्र ठाकूर म्हणाले.