बिहारमध्ये 'जयदु'चे नितीशकुमारच मोटा भाई, भाजपा लढवणार एवढ्या जागा?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 04:54 PM2020-08-24T16:54:19+5:302020-08-24T16:56:35+5:30
बिहारमध्ये सत्तारूढ एनडीए एकजूट असल्याचा दावा करणारा भाजप नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करण्यावर आग्रही होती. बिहार आणि इतरत्र विरोधी पक्षांचा अजिबात मागमूस नाही. जनता आशेने पाहणारा भाजपच एकमेव पक्ष आहे, असा दावा नड्डा यांनी केला
मुंबई - बिहार विधानसभेची आगामी निवडणूक राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) भाजप, जेडीयू आणि लोजप हे तीनही घटक पक्ष एकत्र लढणार आहेत. त्यासाठी, मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार नितीशकुमार यांची निवड झाल्याची घोषणा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली. नड्डा
जेडीयू आणि चिराग पासवान यांच्या लोजपदरम्यान कुरबूर चालू असताना बिहार प्रदेश भाजप कार्यकारिणी बैठकीच्या समारोप सत्रात व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यामातून संबोधित करताना नड्डा यांनी उपरोक्त स्पष्टोक्ती दिली. आता, जागावाटपाचा फॉर्म्युला कसा ठरला, यावरुन चर्चा सुरू आहे. मात्र, 110, 100 आणि 33 जागांवर ही महाआघाडी निश्चित झाल्याचे समजते.
बिहारमध्ये सत्तारूढ एनडीए एकजूट असल्याचा दावा करणारा भाजप नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करण्यावर आग्रही होती. बिहार आणि इतरत्र विरोधी पक्षांचा अजिबात मागमूस नाही. जनता आशेने पाहणारा भाजपच एकमेव पक्ष आहे, असा दावा नड्डा यांनी केला. विरोधी पक्षांकडे कोणतीही तत्त्वे नाहीत, दृष्टिकोनही नाही. तसेच जनतेची सेवा करण्याची भावना विरोधकांच्या ठायी नाही. आम्ही निश्चित विजयी होऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
बिहार विधानसभेसाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आल्याने भाजपा किती जागांवर निवडणूक लढवणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यानुसार, 110, 100 आणि 33 जागांवर ही महाआघाडी निश्चित झाल्याचे समजते. म्हणजे, जनता युनायडेट दल 110, भाजपा 100 आणि लोकजनशक्ती पार्टी 33 जागांवर आपले उमेदवार निश्चित उभे करणार आहे. याबाबत अद्याप घोषणा केली नाही, पण लवकरच जागावाटपांचा फॉर्म्युला ठरल्याचे घोषणा होऊ शकते असे सांगण्यात येत आहे. बिहारमध्ये गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेला जदयु बिहारच्या राजकारणात मोठा भाऊ आहे. यंदाही मोठ्या भावाची जागा बिहारलाच मिळणार आहे.
निवडणूक वेळेवरच होईल...
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी काही राजकीय पक्षांकडून होत असताना बिहार विधानसभेची निवडणूक वेळेवर होईल, असे निवडणूक आयोगाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले. बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपणार आहे. आॅक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान निवडणूक होईल, असेही संकेत आहेत. अलीकडेच निवडणूक आयोगाने कोरोनाच्या काळात निवडणुका घेण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. नियम पाळून निवडणूक प्रक्रिया पार पडेल.