जेडीयू अध्यक्ष ललन सिंह यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले, मला राजीनामा द्यायचा असेल तर...,
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 03:27 PM2023-12-28T15:27:15+5:302023-12-28T15:28:09+5:30
Lalan Singh: गेल्या काही दिवसांपासून बिहारमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या जेडीयूमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन उर्फ ललन सिंह यांनी राजीनामा दिला आहे, अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान ललन सिंह यांनी पहिल्यांदाच मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून बिहारमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या जेडीयूमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन उर्फ ललन सिंह यांनी राजीनामा दिला आहे, नितीश कुमार यांचा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे, अशा वार्ता गेल्या काही दिवसांपासून पसरत आहेत. या चर्चांना जेडीयूचा माजी मित्रपक्ष असलेल्या भाजपाच्या नेत्यांकडून या चर्चांना बळ दिलं जात होतं. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं होतं.
आता या चर्चांदरम्यान, ललन सिंह यांनी पहिल्यांदाच मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ललन सिंह म्हणाले की, नितीश कुमार हे जनता दल युनायटेडचे सर्वमान्य नेते आहेत. तसेच जनता दल युनायटेड एक आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुम्हाला काहीही मिळणार नाही.
दरम्यान, आज दिल्लीमध्ये नितीश कुमार आले तेव्हा त्यांना ललन सिंह यांच्यासोबत होणाऱ्या भेटीबाबत विचारण्यात आले. या भेटीबाबत काय सांगाल, असं विचारलं असता नितीश कुमार म्हणाले की, आमची दरवर्षी राष्ट्रीय स्तरावरील बैठक होते. त्याच दृष्टीकोनातून ही बैठक ठेवण्यात आली आहे. उद्या बैठक आहे. तर आम्ही आज आलो आहोत. यावेळी जेडीयूच्या पोस्टरवरून ललन सिंह यांचा फोटो गायब असल्याबाबत त्यांना विचारण्यात आले, मात्र नितीश कुमार यांनी उत्तर देणे टाळणे पसंद केले.