जेडीयूकडून भाजपाला अजून एक धक्का; बिहारबाहेर स्वबळावर लढण्याची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 02:59 PM2019-06-09T14:59:52+5:302019-06-09T15:00:32+5:30
नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने दणदणीत विजय मिळवला होता. लोकसभेच्या निकालांना महिना उलटत नाही तोच एनडीएमध्ये धुसफूस सुरू झाली आहे.
पाटणा - नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने दणदणीत विजय मिळवला होता. लोकसभेच्या निकालांना महिना उलटत नाही तोच एनडीएमध्ये धुसफूस सुरू झाली असून, पुरेशी मंत्रिपदे न मिळाल्याने मंत्रिमंडळात सहभागी न झालेल्या नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाने भाजपाला आज अजून एक धक्का दिला आहे. भाजपाशी असलेली आघाडी केवळ बिहारपुरती मर्यादित ठेवताना बिहारबाहेर सर्व ठिकाणी स्वबळावर निवडणुका लढण्याची घोषणा जेडीयूने केली आहे.
जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीची बैठक आज पाटणा येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर जेडीयूने एनडीएतील आपल्या सहभागाबाबत मोठी घोषणा केली आहे. भाजपासोबतची एनडीएमधील आघाडी ही केवळ बिहारपुरती मर्यादित ठेवण्याची आणि बिहारबाहेर एनडीएचा घटक पक्ष म्हणून काम न करण्याची घोषणा जेडीयूने केली. त्यामुळे जेडीयू आणि भाजपाची आघाडी ही केवळ बिहारपुरती मर्यादित राहणार आहे. तर बिहारबाहेर जेडीयू स्वबळावर निवडणुका लढणार आहे. आगामी वर्षभरात विधानसभेच्या निवडणुका होणाऱ्या जम्मू काश्मीर, झारखंड, हरियाणा, दिल्ली आदी राज्यात जेडीयू स्वबळावर लढणार आहे.
Janata Dal United (JDU) will not be a part of National Democratic Alliance (NDA) outside the state of Bihar. JDU will fight the upcoming elections alone in J&K, Jharkhand, Haryana & Delhi. The decision has been taken in the party's National Executive Meet today. pic.twitter.com/LfwMgZs2l3
— ANI (@ANI) June 9, 2019
मंत्रिमंडळातील खातेवाटपानंतर एनडीएमध्ये धुसफूस सुरू झाली होती. मंत्रिमंडळात पुरेसा वाटा न मिळाल्याने जेडीयूने सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतसा होता. तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इफ्तार पार्टीच्या निमित्ताने काही विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तसेच ते एनडीएतून बाहेर पडतील अशी, शक्यता वर्तवण्यात येत होती.