जीन्स-लेगिंग्जला कॉलेजमध्ये बंदी
By Admin | Published: August 14, 2016 01:59 AM2016-08-14T01:59:34+5:302016-08-14T01:59:34+5:30
पाटण्याच्या मगध महिला महाविद्यालयाने विद्यार्थिनींनी यापुढे जीन्स वा लेगिंग्ज घालून येता कामा नये, असा आदेश काढला आहे. सर्व विद्यार्थिनींनी सलवार-कुर्ता आणि वरून ब्लेझर असा युनिफॉर्म
- एस. पी. सिन्हा, पाटणा
पाटण्याच्या मगध महिला महाविद्यालयाने विद्यार्थिनींनी यापुढे जीन्स वा लेगिंग्ज घालून येता कामा नये, असा आदेश काढला आहे. सर्व विद्यार्थिनींनी सलवार-कुर्ता आणि वरून ब्लेझर असा युनिफॉर्म घालूनच यावे, असा आदेश असून, उल्लंघन केल्यास एक हजार रुपये दंड करण्यात येईल व प्रसंगी महाविद्यालयातून मुलीला काढण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
या महाविद्यालयातील बहुतांश विद्यार्थिनी साधारणपणे सलवार-कुर्ता हाच वेष परिधान करतात. अधूनमधून जीन्स घालतात, तर काही वेळा सलवारऐवजी लेगिंग्ज घालतात. आतापर्यंत अशा विद्यार्थिनींवर व्यवस्थापनाने कधीही कारवाई केली नव्हती, पण काही दिवसांपूर्वी एक विद्यार्थिनी शर्ट आणि शॉर्ट पँट घालून वर्गात येताच, सर्व शिक्षक आणि व्यवस्थापन हादरूनच गेले.
त्यानंतरच व्यवस्थापनाने वरील आदेश काढला. महाविद्यालयच्या प्राचार्य उषा सिंह म्हणाल्या की, शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींनी शिस्त पाळायला हवी. कोणताही पेहराव घालून येणे योग्य नाही. त्यामुळे १६ आॅगस्टपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जी विद्यार्थिनी आदेशाचे पालन करणार नाही, तिला एक हजार रुपये दंड करण्यात येईल. तिच्या पालकांना समज देण्यात येईल. पुन्हा एखाद्या विद्यार्थिनीने आदेशाचे उल्लंघन केले, तर तिचे
नावच महाविद्यालयातून काढण्यात येईल.
हा आदेश जुनाच असून, त्याचे पालन होत नव्हते, पण त्याचा गैरफायदा काही जणी घेत आहेत, असे आढळून आल्याने तोच आदेश नव्याने काढण्यात आला, असे प्रा. उषा सिंह यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
नावच काढून टाकू
जी विद्यार्थिनी या आदेशाचे पालन करणार नाही, तिला एक हजार रुपये दंड करण्यात येईल. तिच्या पालकांना महाविद्यालयात बोलावून समज देण्यात येईल.
पुन्हा एखाद्या विद्यार्थिनीने आदेशाचे उल्लंघन केले, तर तिचे नावच महाविद्यालयातून काढण्यात येईल.