जेईई अॅडव्हान्समध्ये पुण्याचा चिराग फलोर टॉपर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 01:58 AM2020-10-06T01:58:11+5:302020-10-06T02:00:56+5:30
टॉप ११ मध्ये मुंबई विभागातून पाच; कनिष्का मित्तल विद्यार्थिनींमध्ये सर्वप्रथम
- एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : आयआयटीने (दिल्ली) सोमवारी जेईई अॅडव्हान्स परीक्षेच्या जाहीर केलेल्या निकालात पुण्याच्या चिराग फलोर याने ३९६ पैकी ३५२ गुण मिळवून भारतात पहिला क्रमांक मिळवला. रँकिंगमध्ये १७ व्या पायरीवर असलेल्या आयआयटी (रुडकी) झोनमधून कनिष्का मित्तलने विद्यार्थिनींमध्ये ३९६ पैकी ३१५ गुण मिळवून पहिले स्थान मिळवले.
या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे आयआयटी (मुंबई) झोन सर्वश्रेष्ठ राहिला. परंतु, टॉप ५०० मध्ये सगळ््यात जास्त १४० विद्यार्थी आयआयटी (मद्रास)चे आहेत. आयआयटी मुंबई झोनमधील टॉप ५०० मध्ये समाविष्ट विद्यार्थ्यांची संख्या १०४ राहिली. टॉप ११ विद्यार्थ्यांपैकी टॉप ५ आयआयटी मुंबई झोनचे आहेत. त्यात चिराग फ्लोर रँक-१, आर. मुहेंद्र राज रँक-४, वेदांग धीरेंद्र आश्गोंकर रँक-७, स्वयंम चुबे रँक-८ आणि हर्ष शाह रँक-११ यांचा समावेश आहे. आयआयटी (दिल्ली)चे संचालक प्रो. व्ही. रामगोपाल राव यांनी ‘लोकमत’ ला सांगितले की, जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी देशभरात १६०८३८ विद्यार्थ्यांनी नाव नोंदवले होते. त्यातील १५०८३८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात ११७९८७ विद्यार्थी व ३२८५१ विद्यार्थिनी होत्या. ४३२०४ विद्यार्थी व ६७०७ विद्यार्थिनी यशस्वी ठरल्या. टॉप १०० मधील विद्यार्थ्यांना हवा तो अभ्यासक्रम मिळेल.
नोंदणी करावी लागेल
यशस्वी विद्यार्थ्यांना ज्वॉइंट सीट अलोकेशन अॅथॉरिटीत नोंदणी करावी लागेल. जागा गुणवत्तेच्या आधारावर दिल्या जातील. सहा आॅक्टोबरपासून काउंसलिंग प्रक्रिया सुरू होईल. यंदा ७ टप्प्यांऐवजी ६ टप्प्यांतच काउंसिलिंग केले जाईल.
मुंबई झोनचे १०४ विद्यार्थी
500 रँक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांत आयआयटी मुंबई झोनमधील १०४ विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेत. त्यातील २४ टॉप १०० मध्ये, ४१ टॉप २०० मध्ये, ६३ टॉप ३०० मध्ये, ८२ टॉप ४०० मध्ये आहेत. आयआयटी दिल्ली झोनमधून टॉप ५०० मध्ये ११० विद्यार्थी आहेत. त्यात २२ टॉप १०० मध्ये, ४६ टॉप २०० मध्ये, ७१ टॉप ३०० मध्ये आणि ९२ टॉप ४०० मध्ये समाविष्ट आहेत.