जेईई आणि नीट परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 04:04 AM2020-07-04T04:04:32+5:302020-07-04T04:04:48+5:30
जेईई मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या शहरातील परीक्षा केंद्र निवडणे शक्य होईल. एनटीएच्या संकेतस्थळावर ४ ते १५ जुलैपर्यंत परीक्षा केंद्रांचे पर्याय उपलब्ध करून दिले जातील
एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : इंजिनीअरिंग व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची जेईई व नीट या परीक्षा आता जुलैऐवजी सप्टेंबर महिन्यात होणार आहेत. जेईई मुख्य परीक्षा १ सप्टेंबर ते ६ सप्टेंबरमध्ये होतील आणि परीक्षांचे निकाल सप्टेंबरच्या अखेरीस लागतील. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी (एमबीबीएस, बीडीएस) नीट परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होणार असून, तिचा निकाल आॅक्टोबर महिन्यात लागेल.
याखेरीज आयआयटीमधील प्रवेशासाठी जी जेईई अॅडव्हान्स परीक्षा होते, ती आता २७ सप्टेंबर रोजी घेतली जाणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक विनीत जोशी यांनी सांगितले की, जेईई मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या शहरातील परीक्षा केंद्र निवडणे शक्य होईल. एनटीएच्या संकेतस्थळावर ४ ते १५ जुलैपर्यंत परीक्षा केंद्रांचे पर्याय उपलब्ध करून दिले जातील. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जेईई मुख्य, जेईई अॅडव्हान्स आणि नीट परीक्षांच्या नव्या तारखांची घोषणा केली. ते म्हणाले की, आरोग्य मंत्रालयाच्या कोरोनासंदर्भातील मार्गदर्शन सूचनांचे पालन करून परीक्षा घेतल्या जातील.