JEE-NEET : 'परीक्षेला विलंब झाला तर…', जगभरातील १५० हून अधिक शिक्षणतज्ज्ञांचं नरेंद्र मोदींना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 05:12 PM2020-08-27T17:12:22+5:302020-08-27T17:16:25+5:30
भारतासह जगभरातील विद्यापीठांच्या १५० हून अधिक शिक्षणतज्ज्ञांनी या परीक्षांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे एकीकडे केंद्र सरकार लोकांना घरी राहण्याचा सल्ला देत आहे, तर दुसरीकडे जेईई (मेन) आणि नीट परीक्षा देखील घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षा घेण्याच्या निर्णयावरुन सध्या केंद्र सरकारवर टीका होत आहे. तसेच, अनेक राजकीय पक्षांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, भारतासह जगभरातील विद्यापीठांच्या १५० हून अधिक शिक्षणतज्ज्ञांनी या परीक्षांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. जर वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षा जेईई (मेन) आणि नीट या परीक्षांना अजून विलंब झाला तर विद्यार्थ्यांच्या भविष्यावर याचा विपरीत परिणाम होईल, असे शिक्षणतज्ज्ञांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
याचबरोबर, काही लोक आपल्या राजकीय अजेंड्याला पुढे नेण्यासाठी विद्यार्थ्य़ांच्या भविष्यासोबत खेळत आहेत. तरूण आणि विद्यार्थी वर्ग हे देशाचे भविष्य आहे. मात्र, त्यांच्या पुढील वाटचालीवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. प्रवेशाबाबत आणि अन्य प्रक्रियांबाबत अनेक शंका असून त्या लवकरात लवकर सोडवल्या गेल्या पाहिजेत, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो विद्यार्थ्यांनी १२ वीची परीक्षा दिली आहे. आता ते प्रवेश परीक्षांची वाट पाहत आहेत. सरकारने जेईई (मेन) आणि नीटच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे. परीक्षेचे आयोजन करण्यात होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्यांच्या बहुमोल असं वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. आपले तरूण आणि विद्यार्थी यांची स्वप्न आणि त्यांचे भविष्य यावर कोणतीही तडजोड होता कामा नये. काही लोक केवळ आपला राजकीय अजेंडा चालवण्यासाठी आणि सरकारचा विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रत्न करत आहेत, असे या पत्रात म्हटले आहे.
याशिवाय, केंद्र सरकार संपूर्ण सुरक्षेची काळजी घेऊन जेईई (मेन) आणि नीट परीक्षांचे आयोजन करेल. मात्र, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून २०२०-२१ या वर्षासाठी अॅकॅडमिक कॅलेंडर तयार केले पाहिजे, असेही या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठविलेल्या या पत्रावर दिल्ली विद्यापीठ, इग्नू, लखनौ विद्यापीठ, जेएनयू, बीएचयू, आयआयटी दिल्ली, लंडन विद्यापीठ, कॅलिफोर्निया विद्यापीठ, हिब्रू विद्यापीठ आणि इस्रालयच्या बेन गुरियन विद्यापीठातील प्राचार्यांनी स्वाक्षरी केली आहे.
"मोदीजी, तुमच्याप्रमाणे विद्यार्थी 8000 कोटींच्या विमानातून परीक्षा द्यायला जात नाहीत"
माजी खासदार पप्पू यादव यांनी जेईई (मेन) आणि नीटपरीक्षा घेण्याच्या मुद्द्यावरून ट्विटद्वारे मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. "नरेंद्र मोदीजी, विद्यार्थी तुमच्याप्रमाणे आठ हजार कोटींच्या चार्टर्ड प्लेनमधून IIT आणि NEET ची परीक्षा द्यायला जात नाही. ते ट्रेन आणि बसच्या गर्दीतून प्रवास करतात, ज्या अद्याप सुरु झालेल्या नाहीत. तर आपल्याला एवढीशी गोष्ट समजत नाही का, हे विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी केंद्रावर कसे जाणार. माल (पैसा) घेऊन त्यांच्या (विद्यार्थ्यांच्या) जीवाचा शत्रू का होत आहात?", असे ट्विट पप्पू यादव यांनी केले आहे.
आणखी बातम्या...
उद्धव ठाकरेंनी बिगर भाजपाशासित राज्यांचे नेतृत्व करावे- संजय राऊत
घर घेणाऱ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा दिलासा, 31 डिसेंबरपर्यंत स्टॅम्प ड्युटीत मोठी कपात
Accenture पाच टक्के कर्मचारी कपात करणार, भारतीय स्टाफवरही होणार परिणाम
"मोदीजी, तुमच्याप्रमाणे विद्यार्थी 8000 कोटींच्या विमानातून परीक्षा द्यायला जात नाहीत"
'सुशांत सिंह राजपूतवर विषप्रयोग?', भाजपा नेत्याचा खळबळजनक दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात शक्तिशाली नेते, अभिनेत्री कंगना राणौतकडून ट्विट
आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले; 30 सप्टेंबरपासून लागू होणार
CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...