वर्षातून चार वेळा जेईई-मेन्स परीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 04:54 AM2020-12-17T04:54:15+5:302020-12-17T04:54:29+5:30
मराठीसह तेरा भाषांत असेल पेपर, विद्यार्थ्यांना होणार मदत
नवी दिल्ली : अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांसाठी खूशखबर आहे. यासाठी घेण्यात येणारी जेईई-मेन्स परीक्षा २०२१ पासून वर्षातून दोनदा नव्हे, तर चार वेळा घेण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना गुण वाढविण्यास मदत मिळेल, असे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितले.
याबाबत केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितले की, पालक आणि विद्यार्थ्यांच्या सूचनेनुसार हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. सध्या फेब्रुवारीत आयोजित पहिल्या सत्रातील जेईई-मेन्स परीक्षेसाठी नोंदणी सुरू असून, इच्छुक विद्यार्थी १६ जानेवारीपर्यंत नोंदणी करू शकतात. ही परीक्षा संगणकआधारित असेल. फक्त बी.आर्कची परीक्षा पेन-पेपर (ऑफलाइन) आधारित असेल.
प्रत्येक परीक्षेचा निकाल परीक्षेच्या शेवटच्या दिवसानंतर ४ ते ५ दिवसांत जाहीर केला जाईल. निकाल घोषित झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढच्या परीक्षेसाठी पोर्टलवर नोंदणी करावी. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) सर्व राज्यांशी या वेळापत्रकाबाबत सल्लामसलत केली.
या भाषांचा समावेश
२०२१ मध्ये जेईई-मेन्स परीक्षा पहिल्यांदाच मराठी, असामिया, बंगाली, कन्नड, मल्याळम, ओडिया, पंजाबी, तामिळ, तेलगू आणि उर्दू भाषेत होईल. यापूर्वी ही परीक्षा इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषेत घेतली जात होती.
असे आहे वेळापत्रक
फेब्रुवारी : २३ ते २६ फेब्रुवारी
मार्च : १५ ते १८ मार्च
एप्रिल : २७ ते ३० एप्रिल
मे : २४ ते २८ मेे