वर्षातून दोनदा होणार जेईई, नीट, नेट आणि सीटेटच्या परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 01:31 AM2018-05-02T01:31:43+5:302018-05-02T01:31:43+5:30
नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने (एनटीए) डिसेंबर २०१८मध्ये पहिली परीक्षा घेतली जाणार आहे. याची स्थापना केंद्र सरकारच्या वतीने जेईई मेन्स, नीट, नेट आणि सीटेट परीक्षांसाठी करण्यात आली आहे.
एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने (एनटीए) डिसेंबर २०१८मध्ये पहिली परीक्षा घेतली जाणार आहे. याची स्थापना केंद्र सरकारच्या वतीने जेईई मेन्स, नीट, नेट आणि सीटेट परीक्षांसाठी करण्यात आली आहे. यामुळे सीबीएसईवरील बोर्ड परीक्षांशिवाय अन्य परीक्षांचा ताण कमी होणार आहे. तसेच उच्चशिक्षण संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील नोकऱ्यांत पात्रता मापदंडाची परीक्षा आयोजित करण्यासाठी एक वेगळी एजन्सी मिळणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, एनटीएच्या माध्यमातून केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयात शिक्षक भरती परीक्षांचे आयोजनही होईल. यापूर्वी मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून सांगण्यात येत होते की, एनटीए २०१९मध्ये पहिल्या परीक्षेचे आयोजन करील. एनटीएचे महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आलेले आयएएस विनीत जोशी यांनी पदभार स्वीकारताच मंत्रालय याबाबत गतीने काम करण्यासाठी सक्रिय झाले आहे. विनीत जोशी हे यापूर्वी केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचे (सीबीएसई) अध्यक्ष राहिलेले आहेत. बोर्डातून ते प्रतिनियुक्तीवर मणिपूरला गेले होते. सीबीएसईमधील बोर्ड परीक्षांच्या प्रश्नपत्रिका लीक प्रकरणानंतर बोर्डाकडून आयोजित करण्यात येणाºया अन्य परीक्षांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. अशावेळी सरकारचा असा प्रयत्न आहे की, लवकरात लवकर एनटीएच्या माध्यमातून परीक्षांचे आयोजन केले जावे. यामुळे बोर्डाचे काम केवळ शाळांना संलग्नता देणे, बोर्डाची परीक्षा घेणे आणि निकाल जाहीर करण्यांपर्यंतच मर्यादित राहणार आहे. तसेच, यामुळे परीक्षांची गुणवत्ताही सुधारणार आहे.
विद्यार्थ्यांना दोनदा संधी
मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव (उच्च शिक्षण) आर. सुब्रह्मण्यम यांनी सांगितले की, एनटीएच्या स्थापनेने अनेक फायदे होणार आहेत. सध्या इंजिनीअरिंग आणि मेडिकल शिक्षण संस्थात प्रवेशासाठी वर्षातून एकदा प्रवेश परीक्षा होते. एनटीए २०१९पासून वर्षातून दोनदा या परीक्षांचे आयोजन करणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना वर्षातून दोन संधी मिळणार आहेत. याशिवाय शाळेतील शिक्षक भरतीसाठी अनिवार्य पात्रता चाचणी सीटेट आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्राध्यापक होण्यासाठी नेट परीक्षेचे आयोजनही वर्षातून दोनदा होणार आहे. केंद्र सरकारकडून एनटीएच्या स्थापनेसाठी २५ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.