जलीकट्टू होणारच
By admin | Published: January 21, 2017 05:08 AM2017-01-21T05:08:58+5:302017-01-21T05:08:58+5:30
तामिळनाडूच्या सांस्कृतिक परंपरेशी नाते सांगणाऱ्या जलीकट्टूसाठी (बैलांचा खेळ) वटहुक माला केंद्र सरकारने शुक्रवारी रात्री मंजुरी दिली.
नवी दिल्ली : तामिळनाडूच्या सांस्कृतिक परंपरेशी नाते सांगणाऱ्या जलीकट्टूसाठी (बैलांचा खेळ) वटहुक माला केंद्र सरकारने शुक्रवारी रात्री मंजुरी दिली. गृह, कायदा आणि पर्यावरण मंत्रालयाच्या मंजुरीनंतर प्रकरण राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आले आहे, तर तामिळनाडू सरकार शनिवारी सकाळी कॅबिनेटची बैठक बोलावू शकते. क्रौर्य प्रतिबंधक प्राणी कायदा १९६० मध्ये दुरुस्ती करण्यात आली असून, आता हा कायदा बैलांसाठी लागू असणार नाही. तामिळनाडूतील जनतेने आंदोलन थांबवावे, असे आवाहन मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी केले आहे.
अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी न्या. दीपक मिश्रा आणि न्या. आर. भानुमती यांच्या खंडपीठासमोर सांगितले की, जलीकट्टूशी तामिळ नागरिकांच्या भावना जोडलेल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकार यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. न्यायालयाने एक आठवडा यावर निर्णय देऊ नये ही विनंती न्यायालयाने मान्य केली. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी २१ जानेवारी रोजी २०१४च्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास नकार दिला होता. जलीकट्टूसह देशात बैलगाडींच्या शर्यतीत बैलांच्या वापरावर यात बंदी घालण्यात आली होती. न्यायालयाने तामिळनाडू रेग्युलेशन आॅफ जल्लीकट्टू अॅक्ट २००९ला घटनेच्या कलम २५४ (१)चे उल्लंघन असल्याचे सांगत घटनात्मकदृष्ट्या अस्वीकृत ठरविले होते.
>रजनीकांत, रहेमानसह कलाकार रस्त्यांवर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कायदेतज्ज्ञांशी याबाबत चर्चा केल्यानंतर बोलताना मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम म्हणाले की, याचा मसुदा केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविण्यात आला आहे. जलीकट्टूचा मार्ग मोकळा करण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार्याने क्रौर्य प्रतिबंधक प्राणी कायदा १९६०मध्ये दुरुस्ती करण्यात येईल. तथापि, राष्ट्रपतींचा आदेश मिळाल्यानंतर तामिळनाडूचे राज्यपाल या प्रकरणी वटहुकूम जारी करतील. तामिळनाडूत या मुद्द्यावरून तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मरिना बीचवर मोठ्या संख्येने तरुण त्यासाठी जमले आहेत. मदुराईत जलीकट्टूचे मोठ्या प्रमाणात आयोजन होते. तेथे आज रेल्वे रोखण्याचा प्रयत्न झाला. आज चेन्नईमध्ये झालेल्या आंदोलनात तामिळ अभिनेते रजनीकांत यांच्यासह अनेक चित्रपट कलावंत तसेच खेळाडू सहभागी झाले होते. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकतर्फेही ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. त्यात द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन, खा, कण्णीमोळी, दयानिधी मारन आदी नेते सहभागी झाले होते. स्टॅलिन यांना पोलिसांनी काही काळ ताब्यात घेतले. पुडुच्चेरीमध्येही जलीकट्टूसाठी आंदोलने झाल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले.