पुलवामा हल्ल्याचा बदला पूर्ण; जैशचा कमांडर सज्जाद भटला लष्कराने धाडलं यमसदनी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 01:00 PM2019-06-18T13:00:13+5:302019-06-18T13:00:52+5:30
अनंतनाग परिसरात सकाळपासून सुरु असलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये एक भारतीय जवान शहीद झाला आहे. सुरक्षा यंत्रणांची अद्यापही परिसरात शोधमोहीम सुरु आहे.
अनंतनाग - जम्मू काश्मीरच्या अनंतनाग परिसरात मंगळवारी सकाळपासून भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. या चकमकीत भारतीय लष्कराला मोठं यश प्राप्त झालं आहे. पुलवामा हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांमधील एक आणि जैश कमांडर सज्जाद भटला कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आलं आहे. त्याचसोबत आणखी एका दहशतवाद्याला ठार मारण्यात आलं आहे.
अनंतनाग परिसरात सकाळपासून सुरु असलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये एक भारतीय जवान शहीद झाला आहे. सुरक्षा यंत्रणांची अद्यापही परिसरात शोधमोहीम सुरु आहे. पुलवामा हल्ल्यानंतर सज्जाद भट लष्कराच्या निशाण्यावर होता. पुलवामा येथे झालेल्या सीआरपीएफच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्याचं षडयंत्र सज्जादने रचलं होतं. भारतीय लष्कराने केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये जवानांनी दहशतवाद्यांच्या अनेक तळांना लक्ष्य केलं आहे. त्याठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा, दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.
कोण आहे सज्जाद भट?
पुलवामा हल्ल्यानंतर सज्जाद भटबाबत एनआयएने खुलासा केला होता. पुलवामा हल्ल्याच्या 10 दिवसापूर्वी सज्जाद भटने इको कार खरेदी केली होती. दक्षिण काश्मीर खोऱ्यात सज्जाद भट राहत होता. देवबंदी मदरसा सिराज-उल-उलम येथून सज्जादने शिक्षण घेतलं. भटची आई त्राल येथे राहण्यास आहे. याचठिकाणी दहशतवादी बुरहान वाणी वास्तव्यास होता. सज्जाद भटची ओळख आत्मघाती हल्लेखोर म्हणून आहे. त्याला 2018 मध्ये ताब्यात घेण्यात आलं होतं. तसेच भटच्या वडिलांना 2017 मध्ये पकडण्यात आलं होतं.
JeM terrorists Sajjad Maqbool Bhat and Tauseef who were involved in Pulwama terrorist attack (14 Feb) have been neutralized by the security forces in Anantnag encounter today. pic.twitter.com/GPLGr5brnr
— ANI (@ANI) June 18, 2019
गुप्तचर यंत्रणेच्या माहितीवरुन सुरक्षा यंत्रणेची कारवाई
दक्षिण काश्मीरच्या जिल्ह्यातील बिजबेहरा परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेच्या हाती लागली. त्यानंतर भारतीय जवानांनी परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केलं. त्यावेळी दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार करण्यात आला. दहशतवाद्यांच्या गोळीबारास लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं. त्यात दोन दहशतवादी ठार झाले.
काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील मॉस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा करण्यात सुरक्षा यंत्रणांना मोठं यश आलं होतं. पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात झालेल्या चकमकीत मुसाचा खात्मा करण्यात आला. जम्मू काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण असून सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.