जेसिका लाल हत्याकांड : आरोपी मनू शर्माला जेसिकाच्या बहिणीनं केलं माफ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 10:23 AM2018-04-23T10:23:36+5:302018-04-23T11:55:59+5:30
जेसिका लाल हत्यांकाड प्रकरणाच्या तब्बल 19 वर्षांनंतर जेसिकाची बहीण सबरीनानं दोषी मनू शर्माला माफ केले
नवी दिल्ली - जेसिका लाल हत्यांकाड प्रकरणाच्या तब्बल 19 वर्षांनंतर जेसिकाची बहीण सबरीनानं दोषी मनू शर्माला माफ केल्याचे वृत्त समोर आले आहे. सिद्धार्थ वशिष्ठ उर्फ मनू शर्माला तिहार जेलमध्ये स्थलांतरीत करण्याच्या निर्णयावर कोणताही आक्षेप नसल्याचे सबरीनानं म्हटले आहे. जेसिकाच्या हत्या प्रकरणात मनू शर्माला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान, माझ्या बहिणीचा जीव घेणाऱ्याला मी मनापासून माफ केले आहे आणि जर त्याला शिक्षेमध्ये सूट मिळत असेल तर त्यातही अडचण नाही, असे सबरीनानं म्हटले आहे.
टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, सबरीनानं जनकल्याण अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात लिहिलंय की, ''मनू शर्मा कारागृहामध्ये सामाजिक कार्य करत आहे. सोबत अन्य कैद्यांची मदतदेखील करत असल्याची माहिती मिळाली. मनू शर्माची ही सुधारण्याची लक्षणं असल्याचे मला वाटत आहे.''
मनू शर्माच्या सुटकेबाबतही आक्षेप नसल्याचे मी सांगू इच्छिते. त्यानं आपल्या आयुष्यातील 15 वर्ष कारागृहात शिक्षा भोगलीय, असेही सबरीनानं पत्रात नमूद केले आहे.
मी त्याला मनापासून माफ केले आहे. एखाद्याला माफ करुन आयुष्यात पुढे जाणे, याला अनुसरुनच हे म्हणणे आहे. मला माझ्या आयुष्यात पुढे जाण्याची इच्छा आहे. आता मला कोणताही राग आणि द्वेष माझ्या मनात ठेवायचा नाहीय. मला वाटते त्यानं आपली शिक्षा भोगलीय आणि या परिस्थितींमध्ये मला अधिक गुंतायचे नाहीय, असेही तिनं पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, जेल कल्याण अधिकाऱ्यांकडून पीडित कल्याण फंडद्वारे मिळणारी रक्कमदेखील स्वीकारण्यास सबरीनानं नकार दिला आहे. मला या रक्कमेची आवश्यकता नाहीय, ही रक्कम गरजू व्यक्तींपर्यंत अधिकाअधिक पोहोचणं महत्त्वाचे आहे, असेही तिनं सांगितले.