येशू ख्रिस्त व प्रेषित मोहंमदांनी पण दिला होता गोरक्षणाचा संदेश - गोरक्षक
By admin | Published: October 13, 2016 12:54 PM2016-10-13T12:54:07+5:302016-10-13T13:03:10+5:30
'गौ रक्षणा'चा उद्देश पटवून देण्यासाठी गुजरात गौसेवा आणि गौचार विकास बोर्डाने येशू ख्रिस्त आणि प्रेक्षित मोहम्मद यांचे दाखले दिले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. १३ - 'गो रक्षणा'चा उद्देश पटवून देण्यासाठी गुजरात गौसेवा आणि गौचार विकास बोर्डाने येशू ख्रिस्त आणि प्रेषित मोहम्मद यांचे दाखले दिले आहेत. 'गौ वंदना-कार्य सरीता' हा मजकूर विकास बोर्डाच्या संकेतस्थळावर अपलोड केला आहे. या मजकूरामध्ये महनीय व्यक्तिंनी गाईचे महत्व कशा प्रकारे अधोरेखित केले आहे त्याची उदहारणे दिली आहेत.
गाईची हत्या करणे हे सुद्धा मानव हत्येइतकेच मोठे पाप आहे असे येशू ख्रिस्तांनी म्हटल्याचे मजकूरात उल्लेख आहे. सर्व प्राण्यांमध्ये गाय उत्तम प्राणी आहे त्यामुळे गायीचा आदर करा. गाईचे दूध आणि तूप म्हणजे अमृत आहे. बीफ खाणे आजाराला कारण ठरते असे प्रेषित मोहम्मद यांनी सांगितल्याचे गौचार विकास बोर्डाने म्हटले आहे.
जमियत-इ-उलेमा-ए-हिंदचे सरचिटणीस मुफ्ती अब्दुल कय्यूम यांनी गौचार विकास बोर्डावर टीका केली आहे. प्रेषित मोहम्मद यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात गाय कधी पाहिली नाही. प्रेषित मोहम्मद अरबस्तानमध्ये राहिले तिथे कुठे गाई होत्या? ते कधी अरबस्तानच्या बाहेर आले नाहीत. त्यामुळे त्यांनी गाईचे महत्व विषय करणे शक्य नसल्याचे मुफ्ती अब्दुल यांनी म्हटले आहे.
गोरक्षेशी संबंधित लोक महनीय व्यक्तींचे चुकीचे संदर्भ देऊन दिशाभूल करीत आहेत असे त्यांनी सांगितले. येशू सर्व प्राण्यांवर प्रेम करण्याबद्दल बोलले आहेत ते फक्त गाईबद्दल बोललेले नाहीत. त्यांचा विचार मान्य आहे पण तो सर्व प्राण्यांबद्दल आहे असे सेंट झेव्हीयर्स लोयोला हॉल हाय स्कूलचे मुख्याध्यापक फादर एफ दुराई यांनी सांगितले.