VVIP हेलिकॉप्टर नंतर आता 208 मिलिअन डॉलर्सचा जेट विमान खरेदी घोटाळा
By admin | Published: September 10, 2016 05:23 PM2016-09-10T17:23:13+5:302016-09-10T17:45:01+5:30
रक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) एअरक्राफ्ट निर्मिती करणा-या ब्राझीलमधील एम्बरेरकडून 208 मिलिअन डॉलर्सच्या घोटाळा प्रकरणी स्पष्टीकरण मागितलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) एअरक्राफ्ट निर्मिती करणा-या ब्राझिलमधील एम्बरेरकडून 208 दशलक्ष डॉलर्सच्या घोटाळा प्रकरणी स्पष्टीकरण मागितलं आहे. करार करण्यासाठी एम्बरेरने 208 दशलक्ष डॉलर्सची लाच दिल्याचा आरोप असून 2008 मध्ये म्हणजे युपीएच्या कार्यकाळात हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. अमेरिकी तपास संस्थांच्या चौकशीमध्ये 2008 मध्ये करार मिळवण्यासाठी लाच दिली गेली असल्याचं समोर आलं आहे.
एम्बरेर आणि डीआरडीओमध्ये 2008 मध्ये करार झाला होता त्यानुसार तीन EMB-145 जेट विमान खरेदी करण्यात येणार होती. एम्बरेरने 2011 मध्ये पहिलं EMB-145 डीआरडीओच्या हवाली केलं होतं. त्यानंतर इतर विमानांची डिलिव्हरी करण्यात आली होती. अमेरिकेच्या न्यायविभागाने एम्बरेरविरोधात 2010 पासून चौकशी सुरु केली आहे. करार करताना लाच दिल्याचा संशय आल्यानंतर ही चौकशी सुरु करण्यात आली होती. तेव्हापासून चौकशीची व्याप्ती वाढली असून तब्बल 8 देशांसोबत करण्यात आलेल्या करारांवर संशयाची सुई असून चौकशी सुरु आहे. डीआरडीओने मात्र आम्हाला या घोटाळ्यासंबधी काहीच माहित नसल्याची भूमिका घेतली असून यासंदर्भात अधिक माहिती मिलवत असल्याचं म्हटलं आहे.