'जेट'ने जाताना 'वेट' सांभाळा; आता एकाच बॅगेत सगळं सामना गुंडाळा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2018 01:49 PM2018-06-16T13:49:24+5:302018-06-16T13:49:24+5:30
जेटने प्रवास करताना, 'हेही घेऊ', 'तेही घेऊ' ही आपली नेहमीची 'पॉलिसी' आपल्याला बाजूला ठेवावी लागणार आहे....
नवी दिल्लीः येत्या १५ जुलैनंतर जेट एअरवेजनं प्रवास करणार असाल, तर आपल्याला बॅग भरताना स्वतःवर थोडं नियंत्रण ठेवावं लागेल. 'हेही घेऊ', 'तेही घेऊ' ही आपली नेहमीची 'पॉलिसी' विसरावी लागेल. कारण, कंपनीनं आपली चेक-इन बॅगेज पॉलिसी बदलली असून बॅगची संख्या आणि वजनाबाबत नवे नियम लागू केलेत. देशांतर्गत प्रवासासाठी बॅगच्या संख्येवर निर्बंध आणणारी जेट ही पहिली भारतीय कंपनी ठरली आहे.
इकॉनॉमी क्लासचं तिकीट असलेल्या प्रवाशांना आपल्यासोबत एकच बॅग निःशुल्क नेता येईल. त्यातील सामानाचं वजन कमाल १५ किलो असू शकतं, असं जेट एअरवेजच्या नव्या नियमावलीत नमूद करण्यात आलंय. प्रीमिअर क्लासचे प्रवासी दोन बॅग मोफत घेऊन जाऊ शकतात. त्यातही प्रत्येक बॅगमधील सामानाचं वजन १५ किलोपेक्षा जास्त असता कामा नये. आपण जेट प्लॅटिनम कार्डधारक असाल, तर तुम्ही इकॉनॉमी क्लासमधूनही दोन बॅग नेऊ शकता.
बॅगमधील सामानाचं वजन १५ किलोपेक्षा जास्त असल्यास काय होईल, दंड आकारला जाईल का आणि किती, याबाबत कंपनीनं अद्याप खुलासा केलेला नाही. १४ जूनच्या आधी तिकीट काढलेल्या आणि १५ जुलैच्या आधी प्रवास करणाऱ्यांना बॅगेजचे हे नवे नियम लागू नसतील, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी बॅगेजच्या संख्येवर वर्षभरापूर्वीच बंधनं घालण्यात आली होती. परदेशात देशांतर्गत प्रवास करतानाही प्रवाशांना ही बंधनं पाळावी लागतात.
प्रवाशांच्या बॅगची संख्या कमी झाल्यानं वेळेची बचत होतेच, पण अतिरिक्त बॅगवरील शुल्कातून कंपन्यांना कमाईचीही संधी मिळते. त्यामुळे हळूहळू सर्वच विमान कंपन्या अशी नियमावली लागू करू शकतात.