जेट एअरवेजच्या विमानाचा 36 हजार फुटांवर पुन्हा थरार; शुक्लकाष्ठ संपेना...!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 05:39 PM2018-09-30T17:39:13+5:302018-09-30T17:41:51+5:30
जेट एअरवेजच्या विमानांमध्ये बिघाड होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
नवी दिल्ली : जेट एअरवेजच्याविमानांमध्ये बिघाड होण्याच्या घटना वारंवार घडत असून मुंबई-औरंगाबाद विमानाचा थरार ताजा असतानाच आज पुन्हा तब्बल 36 हजार फुटांवर विमानाचे इंजिन बंद पडल्याने इंदोर विमानतळावर इमर्जन्सी लँडींग करण्यात आले. गेल्या आठवड्यातही मुंबई- जयपूर विमानामधील प्रवाशांना नाकातून आणि कानातून रक्त येण्याचा त्रास सुरु झाल्याने विमान पुन्हा मुंबईला आणण्यात आले होते.
आज सकाळी 10.48 मिनिटांनी जेट एअरवेजच्या विमानाने 96 प्रवाशांना घेऊन हैदराबाद विमानतळावरून उड्डाण केले होते. मात्र, 36 हजार फूट म्हणजेच 11 किमी उंचीवर असताना इंजिनामध्ये बिघाड झाला. यावेळी विमान 850 किमी प्रति मैल या वेगात होते. यामुळे विमानाला इंदोर विमानतळावर तातडीने उतरविण्यात आले. पायलटांनी विमानतळ प्राधिकरण आणि विमान कंपनीच्या तंत्रज्ञांना या प्रकाराबाबत कळविले असून विमानाची दुरुस्ती सुरु आहे.
A Hyderabad bound Jet Airways flight with 96 passengers on-board made an emergency landing at Indore airport due to a technical glitch in the engine; All passengers safe pic.twitter.com/JWqfFUwQgr
— ANI (@ANI) September 30, 2018
जेट एअरवेजबाबत अशा प्रकराची 10 दिवसांतली ही तिसरी घटना आहे. शुक्रवारी सायंकाळी मुंबईहून उड्डाण केलेल्या विमानामध्ये माजी उपमुख्यमंत्री छगऩ भुजबळ यांच्यासमवेत खासदार प्रीतम मुंडेंसह अन्य महत्वाचे पदाधिकारी, अधाकारी औरंगाबादला जात होते. यावेळी विमान अचानक खाली जाऊ लागले होते. या विमानचेही इमर्जन्सी लँडींग करण्यात आले.
तसेच गेल्या आठवड्यात मुंबई- जयपूर विमानामध्ये हवेच्या दाबाचा बिघाड झाल्याने 33 प्रवाशांच्या नाक आणि कानातून रक्त येऊ लागले होते. यामुळे त्यांना पुन्हा मुंबई विमानतळावर आणण्यात आले.