जेठमलानींनी घेतली जेटलींची उलटतपासणी
By admin | Published: March 7, 2017 03:59 AM2017-03-07T03:59:24+5:302017-03-07T03:59:41+5:30
केजरीवाल यांच्या वतीने ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी जेटली यांची दिल्ली उच्च न्यायालयात सुमारे दोन तास कसून उलटतपासणी घेतली
नवी दिल्ली : केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दिवाणी दाव्यात केजरीवाल यांच्या वतीने ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी जेटली यांची दिल्ली उच्च न्यायालयात सुमारे दोन तास कसून उलटतपासणी घेतली.
केजरीवाल व ‘आप’च्या अन्य चार नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन जेटली यांनी दिल्ली क्रिकेट संघटनेचे १० वर्षे अध्यक्ष असताना भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केल्याचे आरोप केले होते. त्यासंदर्भात जेटली यांनी केजरीवाल व इतरांवर न्यायालयात बदनामीचा फौजदारी खटला तर दिल्ली उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा १० कोटी रुपयांचा दिवाणी दावा दाखल केला आहे.
दिल्ली उच्च न्यायालयात फिर्यादी म्हणून जेटली साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे राहिले. प्रतिवादींच्या वतीने जेठमलानी यांनी दोन तास उलटतपासणी घेताना जेटलींना सुमारे ५० प्रश्न विचारले. साक्षीदार व उलटतपासणी घेणारे हे दोघेही मातब्बर वकील असल्याने त्यांच्यातील जुगलबंदी चांगलीच रंगली.
जेठमलानी यांच्या प्रश्नांचा रोख जेटलींच्या दाव्याला आधार नाही, कारण मुळात त्यांची अब्रुनुकसानीच झालेली नाही, यावर होता. केजरीवाल निराधार आरोपांनी आपल्या इभ्रतीची अपरिमित हानी झाली व त्याची भरपाई खरे तर पैशाने होऊ शकत नाही, असे जेटली यांनी म्हटले होते.
जेठमलानी यांनी जेटलींना विचारले की, तुम्ही तुमच्या प्रतिष्ठेच्या हानीचे मूल्यमापन कशाच्या आधारे केले? याला काही ठोस आधार आहे की तुम्ही स्वत:च्या मोठेपणाची ही किंमत ठरविली आहे. यावर जेटलींनी शब्दांच्या कचाट्यात न अडकता असे उत्तर दिले की, माझे श्रेष्ठत्व व प्रतिष्ठा यांचे मूल्यप्मापन मी स्वत: करण्याचा हा प्रश्न नाही. समाजात, मित्र परिवारात व हितचिंतकांमध्ये जो मान आहे त्याआधारे केवळ प्रतिकात्मक म्हणून मी हा १० कोटी रुपयांचा दावा केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>अरविंद केजरीवाल यांना समन्स
केजरीवाल यांच्यावरील आणखी एक फौजदारी बदनामी खटला सोमवारी दंडाधिकारी न्यायालयात सुनावणीस आला व त्यात केजरीवाल यांना आरोपी म्हणून येत्या १९ जुलै रोजी जातीने हजर होण्याचे समन्स जारी करण्यात आले. राज्यसभा सदस्य सुभाष चंद्र यांनी हा बदनामी खटला दाखल केला आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात एका पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी केलेल्या आरोपांवरून चंद्रा यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना कोर्टात खेचले आहे.