मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 08:59 AM2024-11-22T08:59:35+5:302024-11-22T09:00:46+5:30
इम्फाळमधील थांगमेईबंद भागातील ख. जॉयकिशन सिंह यांच्या घरातील अनेक वस्तूंचीही जमावाने तोडफोड केली आहे. घरावर जमावाने हल्ला केला तेव्हा हे आमदार दिल्लीत होते.
इम्फाळ : मणिपूरमधील जनता दल (यू)चे आमदार ख. जॉयकिशन सिंह यांच्या घराची १६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी जमावाने नासधूस केली होती. त्यावेळी त्या लोकांनी घरात ठेवलेली १८ लाख रुपयांची रोख रक्कम व दीड कोटी रुपये किमतीचे दागिने लुटल्याची तक्रार या आमदारांच्या आईने पोलिसांत दाखल केली आहे.
इम्फाळमधील थांगमेईबंद भागातील ख. जॉयकिशन सिंह यांच्या घरातील अनेक वस्तूंचीही जमावाने तोडफोड केली आहे. घरावर जमावाने हल्ला केला तेव्हा हे आमदार दिल्लीत होते. थांगमेईबंद येथील टॉम्बिसाना उच्च माध्यमिक विद्यालयात उभारण्यात आलेल्या मदत शिबिरातील एका विस्थापित व्यक्तीने सांगितले की, आमदारांच्या घरात बटाटे आणि कांदे तसेच थंडीसाठी उपयोगी ठरणारे कपडे यांचा साठा ठेवलेला होता. या वस्तूंचे विस्थापित लोकांमध्ये वाटप करण्यात येणार होते. मात्र जमावाने हे सर्व साहित्य लुटले तसेच आमदाराच्या घरातील लॉकर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर यांची तोडफोड केली. तेथील सात गॅस सिलिंडरही पळविण्यात आले.
‘संपूर्ण मणिपुरात अफस्पा कायदा लागू करा’
दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांकडून लुटलेली शस्त्रे परत मिळविण्यासाठी अफस्पा हा कायदा संपूर्ण मणिपूरमध्ये लागू करा, अशी मागणी त्या राज्याच्या विधानसभेतील कुकी जमातीच्या १० आमदारांनी केली आहे.
भाजपप्रणीत सत्ताधारी आघाडीच्या सात आमदारांचा समावेश आहे. मणिपूरमध्ये हिंसाचारग्रस्त जिरिबामसहित सहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत केंद्र सरकारने अफस्पा कायदा १४ नोव्हेंबर रोजी लागू केला होता.
सीएपीएफच्या आणखी कंपन्या तैनात
मणिपूरमधील वाढता हिंसाचार पाहून तिथे केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (सीएपीएफ) आणखी आठ कंपन्या संवेदनशील भागात तैनात करण्यात आल्या आहेत. या कंपन्या बुधवारी दाखल झाल्या तर त्याच्या एक दिवस आधी सीएपीएफच्या ११ कंपन्या पोहोचल्या होत्या.