IAS चायवाला! डिप्रेशनमधून सावरण्यासाठी सुरू केलं चहाचं दुकान; निर्माण केली नवी ओळख
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 04:22 PM2023-03-15T16:22:21+5:302023-03-15T16:24:01+5:30
दुकानाचं नाव जितकं अनोखं आहे, तितकीच त्याची गोष्टही अनोखी आहे.
सध्या चहाच्या दुकानांचा ट्रेंड आहे. MBA चायवाला ते B.Tech चायवाल्यांची देशभर चर्चा आहे. याच दरम्यान आता झाशीमध्ये चहाचे एक नवीन दुकान उघडले आहे. IAS चायवाला असे दुकानाचे नाव आहे. झाशीच्या वीरांगना नगरमध्ये सुरू झालेले हे चहाचे दुकान संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनले आहे. खरं तर या दुकानाचं नाव जितकं अनोखं आहे, तितकीच त्याची गोष्टही अनोखी आहे. या दुकानात लिहिलेल्या आयएएसचा अर्थ वेगळाच आहे. इथे IAS म्हणजे I Am सचिन.
चहाचे दुकान चालवणारा सचिन सांगतो की, दोन वर्षांपूर्वी आयटीआय केल्यानंतर तो सैन्यात भरती होण्याचा प्रयत्न करत होता, पण कमी उंचीमुळे त्याची निवड होऊ शकली नाही. यामुळे तो डिप्रेशनमध्ये जाऊ लागला. तो नैराश्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होता. दरम्यान, मित्राच्या सांगण्यावरून त्यांनी चहाचं दुकान सुरू केला. हे चहाचे दुकान त्याने सुरू केलं नसतं तर कदाचित त्याने आत्महत्या केली असती, असं सचिनचे म्हणणं आहे. तसेच घरच्यांनीही त्याला पूर्ण पाठिंबा दिल्याचे सांगितले.
आयएएस चायवालाच्या या दुकानात मिळणाऱ्या चहाची नावेही खास आहेत. सुशासन चहा, शांतता आणि समरसता चहा, विकास चहा, महिला सुरक्षा चहा, दंगलमुक्त चहा आणि भ्रष्टाचार मुक्त चहासह अशा अनेक खास चहा येथे उपलब्ध आहेत. चहाची किंमत 10 रुपयांपासून 20 रुपयांपर्यंत आहे. सचिनच्या म्हणण्यानुसार तो चहा विकून चांगली कमाई करतो. सचिनने सांगितले की, हे नाव ठेवण्याची कल्पना त्याच्या एका मित्राने दिली होती. या चहाच्या दुकानात तरुणांसाठी लुडो, बुद्धीबळ ठेवण्यात आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"