"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 10:18 AM2024-11-27T10:18:38+5:302024-11-27T10:19:24+5:30

उत्तर प्रदेशातील झाशी येथील लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये १५ नोव्हेंबरला लागलेल्या आगीच्या घटनेचा रिपोर्ट आता समोर आला आहे.

jhansi medical college fire at jhansi medical college report on jhansi medical college fire incident | "ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

उत्तर प्रदेशातील झाशी येथील लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये १५ नोव्हेंबरला लागलेल्या आगीच्या घटनेचा रिपोर्ट आता समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये अनेक मोठे खुलासे करण्यात आले आहेत. ज्या आयसीयू वॉर्डमध्ये आगीमुळे १० मुलांचा मृत्यू झाला, तेथे क्षमतेपेक्षा जास्त बालकांना दाखल करण्यात आल्याचं रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. 

रिपोर्टमध्ये पुढे म्हटलं आहे की, वैद्यकीय महाविद्यालयाच्या लहान मुलांच्या वॉर्डमध्ये केवळ १८ मुलांना दाखल करण्याची क्षमता होती, मात्र १५ नोव्हेंबर रोजी या वॉर्डात एकूण ४९ बालकांवर उपचार सुरू होते. या अहवालात इतरही अनेक मोठे खुलासे आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी तज्ञांची समिती स्थापन केली होती. 

वरिष्ठ आयएएस अधिकारी किंजल सिंह यांचा समावेश असलेल्या तपास पथकाने आठवडाभर वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन घटनेच्या वेळी उपस्थित लोकांशी चर्चा करून रिपोर्ट तयार केला आहे. याप्रकरणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह काही डॉक्टरांवर कारवाई होऊ शकते, असं सूत्रांचं म्हणणं आहे. द क्रिटिकल केअर युनिटमध्ये १८ मुलांची क्षमता आहे. आग लागली त्यावेळी एकूण ४९ मुलांना दाखल करण्यात आलं होतं. काही मशिन्स एक्स्टेंशन वायरला जोडल्याचंही तपासात निष्पन्न झालं. 

भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी काय केलं पाहिजे याचा तपशील रिपोर्टमध्ये देण्यात आला आहे. नॅशनल निओ नेटोलॉजी फोरमने देखील यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती, अशीच एक घटना दिल्लीत घडल्यानंतर असं करण्यात आलं होतं. यूपीचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक हे रिपोर्ट मिळाल्यानंतर दोषींवर कारवाई करणार आहेत. ही घटना १५ नोव्हेंबरच्या रात्री घडली. 

झाशी मेडिकल कॉलेजच्या आयसीयू वॉर्डमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. आग पाहताच ती संपूर्ण वॉर्डात पसरली आणि या आगीत १० मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपस्थित असलेल्या मुलांच्या कुटुंबीयांनी वॉर्डच्या खिडकीची काच फोडून आतून मुलांना बाहेर काढलं. आग इतकी भीषण होती की काही मिनिटांतच संपूर्ण आयसीयू वॉर्ड जळून खाक झाला.

Web Title: jhansi medical college fire at jhansi medical college report on jhansi medical college fire incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.