कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 03:55 PM2024-11-19T15:55:19+5:302024-11-19T15:56:21+5:30
एनआयसीयू वॉर्डमध्ये कर्तव्यावर तैनात असलेल्या नर्स मेघा यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता १५ मुलांची आगीतून सुखरुप सुटका केली.
झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजच्या नवजात शिशु वॉर्डमध्ये शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीत आतापर्यंत १० निष्पाप मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेने देशभरातील लोकांचं मन हेलावलं. घटनेच्या दिवशी एनआयसीयू वॉर्डमध्ये कर्तव्यावर तैनात असलेल्या नर्स मेघा यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता १५ मुलांची आगीतून सुखरुप सुटका केली.
मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या मेघा यांच्या कपड्यांना आग लागली मात्र त्यांच्या ते लक्षात आले नाही. इतर कर्मचाऱ्यांनी अलार्म लावून कपडे जळल्याची माहिती दिली असता मेघा यांनी कपडे काढले. त्यानंतरही त्या मुलांना वाचवण्यात व्यस्त राहिल्या. मेघा यांचं आता देशभरात कौतुक होत आहे. लोक त्यांना झाशीची राणी असंही म्हणत आहेत.
मेघा यांनी एबीपी न्यूजला सांगितलं की, ही घटना इतक्या अचानक घडेल असा सर्वांनी कधीच विचार केला नव्हता. त्या रोजच्या प्रमाणेच काम करत होत्या. वॉर्डमध्ये अचानक शॉर्टसर्किट झालं, जे विझवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. शॉर्टसर्किटला कारणीभूत असलेली वायरही काढून फेकण्यात आली मात्र तोपर्यंत आग सर्वत्र पसरली होती. फायर एक्स्टेंशनद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र ती विझवता आली नाही आणि आग वाढतच गेली.
जीव धोक्यात घालून मुलांना वाचवलं
मुलांच्या लाईव्ह सपोर्टसाठी संपूर्ण वॉर्डात ऑक्सिजन आहे, त्यामुळे आग अधिक वेगाने पसरली. आग विझली जात नव्हती. त्यामुळे आम्ही घाईघाईने आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या आणि पालकांच्या मदतीने मुलांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. आम्ही सतत प्रयत्न करत असताना माझ्या पायजम्यालाही आग लागली. मी मुलांना वाचवण्यात एवढी व्यस्त होते की माझ्या पायजम्याला आग लागली आहे हे माझ्या लक्षातही आलं नाही.
तुझा पायजमा जळाला असं इतरांनी सांगितल्यावर मी जाऊन पायजमा काढला. तोपर्यंत माझा पाय खूप भाजला होता. पण माझ्या पायाची पर्वा न करता मी त्या १५ मुलांना सुखरूप बाहेर हलवलं. आगीच्या ज्वाळांमुळे व्हेंटिलेटरवर दाखल असलेल्या मुलांपर्यंत पोहोचणं कठीण झालं होतं. अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण वॉर्डमध्ये धुराचे लोट दिसत होते. त्यामुळे आम्ही त्या मुलांना वाचवू शकलो नाही असं मेघा यांनी सांगितलं आहे.