आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 03:42 PM2024-11-16T15:42:54+5:302024-11-16T15:44:05+5:30

नवजात बालकांच्या एनआयसीयू वॉर्डमध्ये अचानक लागलेल्या आगीने १० चिमुकल्यांचा मृत्यू झाला. अनेक कुटुंबात शोककळा पसरली आहे. या अपघातात १७ मुलं जखमी झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

jhansi medical college incident cradling newborns nursing staff mothers screamed heart wrenching video | आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video

आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video

झाशीच्या राणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवारी रात्री घडलेली मोठी दुर्घटना काळीज पिळवटून टाकणारी आहे. तसेच व्यवस्थेतील त्रुटीही उघडकीस आणणारी आहे. नवजात बालकांच्या एनआयसीयू वॉर्डमध्ये अचानक लागलेल्या आगीने १० चिमुकल्यांचा मृत्यू झाला. अनेक कुटुंबात शोककळा पसरली आहे. या अपघातात १७ मुलं जखमी झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आगीचे फोटो आणि काही व्हिडीओ आता समोर आले आहेत. तसेच सोशल मीडियावर देखील ते व्हायरल होत आहेत. हे मन हेलावून टाकणारे आहेत. व्हिडीओमध्ये बाळांना हातात घेऊन लोक धावत आहेत. पालकांचा आक्रोश, आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी आणि नर्सिंग स्टाफ जीव धोक्यात घालून मुलांना उचलून बाहेर काढतानाचे दृश्य धक्कादायक आहे.

मुख्य वैद्यकीय अधीक्षक (CMS) सचिन माहोर यांनी या घटनेबाबत सांगितलं की, एकूण ५४ नवजात बालकांना एनआयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. रात्री साडे दहाच्या दरम्यान ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने भीषण आग लागली. आग वेगाने पसरल्याने आतील युनिटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. 

फायर अलार्म आणि पाण्याचे स्प्रिंकलर काम करत नसल्यामुळे बचाव कार्यात विलंब झाला. रुग्णालयातील अग्निशमन यंत्रांची मुदत चार वर्षांपूर्वीच संपली होती. सिलिंडर काम करत नसल्याचं घटनास्थळी उपस्थित लोकांनी सांगितलं. आग विझवण्यासाठी पर्यायी व्यवस्थाही नव्हती.

आग वेगाने पसरत असताना नर्सिंग स्टाफने तसेच काही पालकांनी आपल्या मुलांना हातात उचलून सुरक्षित स्थळी नेलं. अनेक बाळांना दुसऱ्या युनिटमध्ये हलवण्यात आले, मात्र आग इतकी भीषण होती की १० बाळांना आगीतून वाचवता आलं नाही. तसेच अनेक जण जखमी झाले आहेत. 


 

Web Title: jhansi medical college incident cradling newborns nursing staff mothers screamed heart wrenching video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.