महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 06:30 PM2024-10-22T18:30:36+5:302024-10-22T18:32:58+5:30
Jharkhand Assembly Election 2024: महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांमध्ये पुढच्या महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षातील इंडिया आघाडी यांच्या दृष्टीने या निवडणुकीचे निकाल महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र दोन्ही राज्यांत इंडिया आघाडीतील घटकपक्षांमध्ये जागावाटपावरून तणाव निर्माण झालेला आहे.
महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांमध्ये पुढच्या महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षातील इंडिया आघाडी यांच्या दृष्टीने या निवडणुकीचे निकाल महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र दोन्ही राज्यांत इंडिया आघाडीतील घटकपक्षांमध्ये जागावाटपावरून तणाव निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाले आहेत. तर दुसरीकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट पडली आहे. तसेच जागावाटपावरून झालेल्या मतभेदांमधून झारखंडमध्ये सीपीआय (एमएल) पक्षाने इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार इंडिया आघाडीमध्ये जागावाटपाबाबत एकमत होऊ शकलं नाही. त्यामुळे सीपीआय एमएल पक्षाने इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाही तर सीपीआय एमएल पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादीही प्रसिद्ध केली आहे. सीपीआय एमएल पक्षाने राजधनवार येथून राजकुमार यादव, निरसा येथून अरुप चटर्जी आणि सिंदरी येथून चंद्रदेव महतो यांना उमेदवारी दिली आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार राजधनवार विधानसभा मतदारसंघातील जागेवरून झारखंड मुक्ती मोर्चा आणि सीपीआय एमएल पक्षामध्ये मतभेद झाले होते. त्याची परिणती सीपीआय एमएल पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडण्यात झाली. दरम्यान, झारखंडमध्ये इंडिया आघाडीत जागावाटपावरून अद्यापही ओढाताण सुरू आहे. तसेच मागच्या दोन दिवसांपासून आरजेडी आणि झारखंड मुक्ती मोर्चामध्ये काही जागांवरून चर्चा सुरू आहे.