झारखंडमध्ये समान नागरी संहिता लागू करू, आदिवासींना वगळणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 06:37 AM2024-11-04T06:37:57+5:302024-11-04T06:38:31+5:30
Jharkhand Assembly Election 2024: झारखंडमध्ये सत्तेत आल्यास राज्यामध्ये समान नागरी संहिता लागू करण्यात येईल, मात्र त्यातून आदिवासींना बाहेर ठेवण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले. झारखंड विधानसभेसाठी त्यांनी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
- एस. पी. सिन्हा
रांची - झारखंडमध्ये सत्तेत आल्यास राज्यामध्ये समान नागरी संहिता लागू करण्यात येईल, मात्र त्यातून आदिवासींना बाहेर ठेवण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले. झारखंड विधानसभेसाठी त्यांनी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. याशिवाय ‘सरना धर्म संहिता’बाबत चर्चा करुन याेग्य निर्णय घेऊ, असे अमित शाह यांनी यावेळी सांगितले.
शाह म्हणाले, भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०च्या जयंतीचा विचार करुन भाजपने १५० संकल्प केले आहेत. त्यात आदिवासी, महिला, तरुण आणि ज्येष्ठांसह समजातील सर्व घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. पेपरफुटीचा सीबीआय आणि एसआयटीमार्फत तपास करून दाेषींना शिक्षा देऊ. भाजप सत्तेवर आल्यास ५१ वन्यउत्पादने हमीभावाने तसेच ३,१०० रुपये प्रति क्विंटल दराने धान खरेदी करेल, असे शाह म्हणाले.
हा जाहीरनामा आदिवासी समाजाचा विकास, राेजगार देणे तसेच महिलांना सशक्त करणारा आहे. आमचा पक्ष ‘राेटी, बेटी व माटी’च्या रक्षणासाठी प्रतिबद्ध आहे, असे पंतप्रधान नरेंद्र माेदी म्हणाले.
प्रमुख आश्वासने
- २.८७ लाख सरकारी नाेकऱ्या
- ५ लाख राेजगाराच्या संधी
- २,१०० रुपये गाेगाे दिदी याेजनेंतर्गत महिलांना दरमहा देणार
- २१ लाख कुटुंबांना पक्के घर देणार
- दाेन-तीन वर्षांत राज्यातून नक्षलवाद आणि मानव तस्करीची समस्या साेडविणार.