झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत ४६ टक्के मतदान; धोनीनेही साक्षीसह हक्क बजावला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 03:43 PM2024-11-13T15:43:07+5:302024-11-13T15:43:41+5:30
Jharkhand Assembly Election Voting: झारखंडमध्ये विधानसभेच्या ८१ जागा आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात निम्म्याहून अधिक जागांवर मतदान होत आहे.
महाराष्ट्रात मतदानाला अजून आठवडा शिल्लक असताना तिकडे झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. ४३ जागांवर दुपारी १ वाजेपर्यंत ४६ टक्के मतदान झाले आहे. दुपारी प्रसिद्ध क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी आणि त्याच्या पत्नीने मतदानाचा हक्क बजावला आहे.
झारखंडमध्ये विधानसभेच्या ८१ जागा आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात निम्म्याहून अधिक जागांवर मतदान होत आहे. प्रचारासाठी उमेदवारांना खूपच कमी कालावधी मिळालेला आहे. झारखंडमध्ये २.६० कोटी मतदार आहेत, पैकी १.३७ कोटी मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी नेहा अरोरा म्हणाल्या, 'दुपारी 1 वाजेपर्यंत 46.25% मतदान झाल्याचा अंदाज आहे. घाटशिला विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 53.87%, बहरगोरा येथे 53.86% आणि खरसावनमध्ये 53.68% मतदान झाले. आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघन प्रकरणी भवनाथपूरमध्ये 2 आणि जमशेदपूरमध्ये 3 प्रकरणात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
ओडिशाचे राज्यपाल रघुवर दास आणि त्यांची सून आणि जमशेदपूर विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार पूर्णिमा दास साहू यांनी त्यांच्या कुटुंबासह मतदान केले. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही पत्नीसह मतदान केले आहे. तसेच धोनीने देखील पत्नीसह मतदान केले आहे.