Jharkhand Election: मोदी-शहांकडून प्रचार, समोर मुख्यमंत्री उमेदवार; तरीही अपक्षासमोर भाजपाची हार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 10:11 AM2019-12-24T10:11:18+5:302019-12-24T10:15:20+5:30
भाजपाची प्रचार यंत्रणा, मुख्यमंत्र्यांचा करिश्मा, मोदींची झंझावाती सभा बंडखोर उमेदवारासमोर फेल
रांची: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा झंझावाती प्रचार, समोर मुख्यमंत्री रघुवर दास यांच्यासारखा तगडा उमेदवार, झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल यांच्या महाआघाडीचं आव्हान यांचा सामना करत बंडखोर उमेदवार सरयू राय यांनी जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून विजय मिळवला. जमशेदपूर पश्चिम मतदारसंघातून तिकीट नाकारण्यात आल्यानं सरयू राय यांनी बंडखोरी केली. मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी असलेल्या राय यांनी थेट त्यांच्याच जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करत आव्हान उभं केलं.
सरयू राय त्यांच्या सिद्धांतांसाठी ओळखले जातात. त्यामुळेच त्यांनी त्यांच्याच सरकारविरोधात भूमिका घेत बंडखोरी केली. रघुवर दास नाहीत, तर डाग आहेत. हा डाग पंतप्रधान मोदींची डिटर्जंट आणि अमित शहांची लॉन्ड्रीदेखील धुवू शकत नाही, असं म्हणत राय यांनी दास यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. रघुवर दास यांच्या मंत्रिमंडळात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री म्हणून काम केलेल्या राय यांनी दास यांचा करिश्मा, मोदींची प्रचार यंत्रणा आणि तीन पक्षांच्या महाआघाडीला एकहाती टक्कर दिली.
जमशेदपूर पूर्व मतदारसंघ रघुवर दास यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यांनी १९९५ पासून या मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यामुळे सलग सहाव्यांदा जिंकून डबल हॅट्ट्रिक साधण्याचा विश्वास त्यांना होता. त्यातच मोदींनीदेखील त्यांच्यासाठी सभा घेतल्यानं त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. दास यांच्या प्रचारासाठी खुद्द अमित शहांनीदेखील ताकद पणाला लावली. गेल्या निवडणुकीत जमशेदपूर पश्चिम मतदारसंघातून विजयी झाल्यानं सरयू राय यांच्यासाठी मतदारसंघ नवा होता. याशिवाय त्यांच्यासाठी परिस्थिती प्रतिकूल होती. मात्र तरीही त्यांनी सर्व आघाड्यांवर भाजपाला धक्का दिला आणि मुख्यमंत्र्यांचा पराभव करत मोदी-शहांसोबत सगळ्यांनाच धक्का दिला.