Jharkhand Assembly Elections 2019: भाजपाकडून जाहीरनामा प्रसिद्ध; जनतेला दिली 'ही' आश्वासनं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 04:22 PM2019-11-27T16:22:09+5:302019-11-27T16:22:45+5:30
झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
रांचीः झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्याला भाजपानं संकल्पपत्र असं नाव दिलं आहे. मुख्यमंत्री रघुवर दास, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि अर्जुन मुंडा यांच्या उपस्थितीत भाजपानं संकल्पपत्र जारी केलं आहे. या संकल्पपत्रात मुलींना केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. तसेच महिलांना नोकरीमध्ये 33 टक्के आरक्षणाची घोषणा केली आहे. 2022पर्यंत प्रत्येक गरिबाला सरकार घर देणार आहे. शेतकऱ्यांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देणार आहे.
2022पर्यंत 70 नवी एकलव्य विद्यालयं उघडण्यात येणार असून, विद्यालयांची संख्या दुप्पट होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात दोन मेगा कौशल्य केंद्र उघडली जाणार असून, आयटीआय उघडण्याचं आश्वासन दिलं आहे. कृषी उद्योगाच्या विकासाला चालना देण्यात येणार आहे. ज्ञान आणि कौशल्यावर आधारित कृषी क्षेत्राचा विस्तार होणार आहे. झारखंडमध्येही दुग्ध उत्पादनालाही चालना देण्यात येणार आहे. तसेच राज्यात स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीची स्थापना करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय पदक विजेत्यांना पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे. तसेच एँटी ट्रॅफिकिंग पोलीस युनिटचीही स्थापना होणार असून, 2024पर्यंत 22 हजार किमीचे नवे मार्ग बनवण्याचा भाजपाचा संकल्प आहे. 'हो' भाषा समृद्ध करण्यासाठी योजना तयार करण्यात येणार आहे.
संकल्प पत्र जारी केल्यानंतर सीएम रघुवर दास झारखंडला नव्या उंचीवर नेण्यासाठी भाजपा प्रयत्नशील राहणार असल्याचं म्हटलं आहे. राज्यात मजबूत सरकार देणं गरजेचं आहे. गेल्या पाच वर्षांत सर्वांचा विकास झाला आहे. यापुढेही विकास होत राहील, राज्यातील सरकारवर एकही भ्रष्टाचारा आरोप नाही, असंही रघुवर दास म्हणाले आहेत.