मुख्यमंत्र्यांविरुद्ध भाजपने युवा नेत्याला दिले तिकीट, साेरेनविराेधात गमलीयेल हेम्ब्राेम लढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 08:05 AM2024-10-29T08:05:50+5:302024-10-29T08:08:35+5:30
हेम्ब्राेम हे शिक्षक हाेते. त्यांनी २०१९मध्ये ‘आजसू’च्या तिकीटावर साेरेन यांच्याविराेधात निवडणूक लढविली हाेती. मात्र, त्यावेळी त्यांचा दारुण पराभव झाला हाेता.
रांची : झारखंड विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी सोमवारी जाहीर केली. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या विरोधात बरहेत मतदारसंघातून युवा नेते गमलीयेल हेम्ब्रोम यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. याच मतदारसंघातून हेम्ब्रोम यांनी एजेएसयू पक्षाच्या तिकिटावर २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक लढविली होती.
हेम्ब्राेम हे शिक्षक हाेते. त्यांनी २०१९मध्ये ‘आजसू’च्या तिकीटावर साेरेन यांच्याविराेधात निवडणूक लढविली हाेती. मात्र, त्यावेळी त्यांचा दारुण पराभव झाला हाेता.
भाजपनेते विकास महातो यांना तुंडी विधानसभा मतदारसंघातून भाजपने तिकीट दिले आहे. हेमंत सोरेन हे बरहेत मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून, २०१९ मध्ये भाजपचे उमेदवार सायमन माल्टो यांचा २५,७४० मतांनी पराभव केला होता. सोरेन यांनी दुमका व बरहेत या दोन्ही मतदारसंघातून विजय मिळविला होता. त्यातील बरहेत मतदारसंघ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
भाजप ८१ पैकी भाजप ६८ जागा लढवत असून झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) हा पक्ष ८१ पैकी ४३ जागा लढवत आहे.
बाबुलाल मरांडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल
- झारखंड भाजपचे प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी, राज्यमंत्री व झामुमोच्या नेत्या बेबी देवी व अन्य उमेदवारांनी सोमवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
- मरांडी यांनी धनवर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
निवडणूक अधिकाऱ्यांना हटवा : झामुमाे
झारखंडचे मुख्य निवडणूक अधिकारी के.रवीकुमार, दोन वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय आनंद लाठकर व ए.व्ही. होमकर यांंना त्यांच्या पदावरून हटवावे, अशी मागणी झामुमोने केली आहे. हे तिघेही आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असल्याचा आरोप झामुमोने केला.