झारखंडमध्ये विधानसभेसाठी ३० नोव्हेंबरपासून ५ टप्प्यांत मतदान; २३ डिसेंबरला निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 01:09 AM2019-11-02T01:09:18+5:302019-11-02T01:09:36+5:30
झारखंडमध्ये रघुबर दास सरकारने पारदर्शक कारभार केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांत भाजपच पुन्हा विजयी होणार असल्याचा त्या पक्षाच्या नेत्यांचा दावा आहे
नवी दिल्ली : झारखंड विधानसभेच्या ८१ जागांसाठी ३0 नोव्हेंबरपासून पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहेत. या नक्षलग्रस्त राज्यामध्ये मतमोजणी २३ डिसेंबर रोजी होईल. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी शुक्रवारी ही घोषणा केली.
झारखंड विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान ३० नोव्हेंबरला होईल. त्यानंतरच्या चार टप्प्यांत ७, १२, १६ व २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या नक्षलग्रस्त राज्यात २०१४ साली झालेली विधानसभा निवडणूकही पाच टप्प्यांत पार (पान ९ वर) पडली होती.आदिवासीबहुल झारखंडमध्ये सध्या भाजप सत्तास्थानी आहे. मुख्यमंत्री रघुबर दास यांना सत्तेवरून घालविण्यासाठी काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चासह अन्य विरोधी पक्ष कामाला लागले आहेत. पहिल्या टप्प्यात १३ जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात २०, तिसºया टप्प्यात १७, चौथ्या टप्प्यात १५, पाचव्या टप्प्यात १६ जागांसाठी मतदान होईल. निवडणुका जाहीर होताच, राज्यामध्ये आचारसंहिता त्वरित लागू झाली आहे. महाराष्ट्र, हरयाणामधील विधानसभा निवडणुकांत भाजपला अपेक्षित यश मिळू शकले नव्हते. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती झारखंडमध्ये होणार का याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. मेमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांत १४ पैकी १0 जागांवर भाजपने विजय मिळवला होता.
भाजप सत्ता राखणार?
झारखंडमध्ये रघुबर दास सरकारने पारदर्शक कारभार केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांत भाजपच पुन्हा विजयी होणार असल्याचा त्या पक्षाच्या नेत्यांचा दावा आहे. मात्र मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या कारकीर्दीत झारखंडचा अजिबात विकास झाला नाही अशी टीका विरोधकांकडून होत असते. रघुबर दास हे झारखंडमध्ये पाच वर्षे पूर्ण करू शकणारे पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत. याआधी तिथे अस्थिर सरकारे अस्तित्वात होती.