"पंतप्रधान मोदी आणि अमित शाह..."; भाजप प्रवेशासंदर्भात चंपाई सोरेन यांची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 01:56 PM2024-08-27T13:56:33+5:302024-08-27T13:57:56+5:30
चंपाई सोरेन यांनी सादारणपणे महिनाभरापासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे...
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर आपल्याला पूर्ण विश्वास असल्याचे सोरेन यांनी म्हटले आहे. तसेच आता आपण एक नवा अध्याय सुरू केला असल्याचेही ते म्हणाले.
चंपाई सोरेन म्हणाले, "आपण निवृत्त होण्याचा विचार केला होता. मात्र, जनतेच्या मागणीमुळे राजकारणात आहे. स्वतःचे संघटन तयार करण्यासाठी वेळ लागत असतो. आपण आपले मत यापूर्वीच सांगितले होते." महत्वाचे म्हणजे, चंपाई सोरेन यांचा भाजप प्रवेश हा सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चासाठी (जेएमएम) मोठा धक्का मानला जात आहे. तर, भाजप चंपाई सोरेन यांचा एक मोठा आदिवासी नेता म्हणून पक्षात समावेश करण्यास उत्सुक आहे.
चंपाई सोरेन यांनी सादारणपणे महिनाभरापासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. त्यांनी सोमवारी (२६ ऑगस्ट) दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी झारखंड भाजपचे सहप्रभारी हिमंता बिस्वा सरमा देखील उपस्थित होते.
हिमंता बिस्वा सरमा यांनी या बैठकीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत, "आपल्या देशातील ज्येष्ठ आदिवासी नेते चंपाई सोरेन यांनी काही वेळापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ते 30 ऑगस्ट रोजी रांची येथे अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करतील."
आदिवासी मतांवर लक्ष -
2011 च्या जनगणनेनुसार झारखंडची लोकसंख्या 3 कोटी 29 लाख 88 हजार 134 एवढी आहे. यात आदिवासी (एसटी) समाजाचा सहभाग 86 लाख 45 हजार 42 एवढी आहे. झारखंड टायगर म्हणून प्रसिद्ध असलेले चंपाई सोरेन कोल्हान प्रदेशातून येतात. या प्रदेशात सरायकेला, पूर्व सिंगभूम आणि पश्चिम सिंगभूम जिल्ह्यांचा समावेश होतो.