jharkhand election 2019 : मोदी सरकारने झारखंडला विकासाच्या मार्गावर आणले - अमित शहा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 04:52 AM2019-11-29T04:52:29+5:302019-11-29T04:53:20+5:30
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने झारखंडला प्रगती व विकासाच्या मार्गावर नेले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी म्हटले.
छत्रा/गढवा (झारखंड) : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने झारखंडला प्रगती व विकासाच्या मार्गावर नेले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी म्हटले. येथील निवडणूक प्रचारसभेत बोलताना शहा म्हणाले की, झारखंडने पूर्वीच्या सरकारांच्या कारकीर्दीत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार अनुभवला; परंतु रघुबर दास यांच्या विद्यमान सरकारच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही.
झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांची आघाडी ही राज्यात निवडणूक लढवत आहे. हेमंत बाबू (सोरेन) यांना मला हे विचारायचे आहे की, झारखंडचे तरूण स्वतंत्र झारखंडसाठी झगडत असताना काँग्रेसची भूमिका काय होती? अटल बिहारी वाजपेयी सरकारने झारखंडची निर्मिती केली आणि नरेंद्र मोदी सरकारने त्याला प्रगती व विकासाच्या मार्गावर आणले, असेही शहा म्हणाले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती सुधारल्याचा दावा शहा यांनी केला.