ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 04:32 PM2024-11-24T16:32:52+5:302024-11-24T16:34:02+5:30

Jharkhand Election Results 2024 : निवडणूक जिंकलेल्या पार्टीच्या एका आमदाराने निकालानंतर अवघ्या एका दिवसात राजीनामा देण्याचे भाष्य केले आहे. 

Jharkhand Election Results 2024 : AJSU Nirmal mahto says ready to leave this seat for party chief Sudesh Mahato | ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!

ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!

झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत हेमंत सोरेन यांच्या जेएमएमने ३४ जागा जिंकल्या. तर काँग्रेसने १६, आरजेडीने चार आणि सीपीआय(एम)ने दोन जागा जिंकल्या आहेत. दरम्यान, निवडणूक जिंकलेल्या पार्टीच्या एका आमदाराने निकालानंतर अवघ्या एका दिवसात राजीनामा देण्याचे भाष्य केले आहे. 

झारखंडमध्ये ऑल झारखंड स्टुडंट्स युनियनने (आजसू पार्टी) भाजपसोबत युती करून निवडणूक लढवली. मात्र पार्टीला दारुण पराभव पत्करावा लागला. पार्टीने केवळ एक जागा जिंकली तर भाजपसोबत युती करून १० जागा लढवल्या होत्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पार्टीचे अध्यक्ष स्वतः निवडणूक हरले. आजसू पार्टीचे प्रमुख सुदेश महतो यांना सिल्लीमधून पराभवाला सामोरे जावे लागले. आपल्या पार्टीच्या अध्यक्षाचा पराभव झाल्यामुळे नाराजी व्यक्त करत पार्टीचे एकमेक निवडणूक आलेले आमदार निर्मल महतो यांनीही राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे. 

निर्मल महतो म्हणाले, "माझ्या विजयाबद्दल मी मांडू विधानसभेतील सर्व लोकांचे आभार मानतो, पण मी ही जागा सुदेश महतो यांच्यासाठी सोडण्यास तयार आहे. त्यांची भेट घेऊन लवकरच या जागेचा राजीनामा देणार आहे. तसेच, सर्व कार्यकर्त्यांना निवडणुकीची तयारी करण्याचे आवाहन करून सुदेश महतो यांना आमदार करून विधानसभेत पाठवू. जिंकणे आणि हरणे या वेगळ्या गोष्टी आहेत. योग्य मुद्दा मांडणारा नेता हवा आहे. आमचे नेते सुदेश महतो हे आहेत आणि राहतील. सुदेश महतो यांच्यापेक्षा मोठा नेता झारखंडमध्ये जन्माला आलेला नाही आणि होणारही नाही."

दरम्यान, मांडू विधानसभा जागेवर निर्मल महतो यांनी काँग्रेसच्या जयप्रकाश पटेल यांचा अवघ्या २३१ मतांनी पराभव केला. तर दुसरीकडे, आजसू पार्टीचे प्रमुख सुदेश महतो हे सिली मतदारसंघातून निवडणूक हरले. जेएमएमच्या अमित कुमार यांनी त्यांचा २३८६७ मतांनी पराभव केला. अमित कुमार यांना ७३१६९ मते मिळाली तर सुदेश महतो ४९३०२ मतं मिळाली.

हेमंत सोरेन यांनी झारखंडमध्ये रचला इतिहास 
झारखंड विधानसभा निवडणुकीत हेमंत सोरेन यांच्या पक्ष जेएमएमने ३४ जागा जिंकल्या. तर काँग्रेसने १६, आरजेडीला चार आणि सीपीआय(एम) दोन जागा जिंकल्या आहेत. याशिवाय, भाजपने २१, आजसू एक, एलजेपी रामविलास एक, झारखंड लोकतांत्रिक क्रांतीकारी मोर्चाने एक आणि जनता दल युनायटेड एक जागा जिंकली.
 

Web Title: Jharkhand Election Results 2024 : AJSU Nirmal mahto says ready to leave this seat for party chief Sudesh Mahato

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.