भाजपमध्ये सामील होण्यापूर्वी चंपई सोरेन यांच्या सुरक्षेत वाढ, झेड प्लस सुरक्षा मिळणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 10:49 AM2024-08-27T10:49:02+5:302024-08-27T10:50:07+5:30
Champai Soren : झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असतानाच झारखंडमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा पक्षामध्ये मोठी फूड पडण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेते आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. चंपई सोरेन आता झेड प्लस श्रेणीतील सुरक्षा कवचाखाली असतील. दिल्लीहून रांचीला पोहोचताच त्यांना झेड प्लस सुरक्षा मिळेल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंपई सोरेन उद्या म्हणजेच २८ ऑगस्ट रोजी राज्य मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊ शकतात. तसेच ३० ऑगस्ट रोजी रांचीमध्ये अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करतील. दरम्यान, चंपई सोरेन भाजपमध्ये सामील होण्याची माहिती झारखंडचे प्रभारी आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली आहे. हिमंता बिस्वा सरमा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून यासंबंधी माहिती दिली आहे.
काल झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या बैठकीत चंपई सोरेन यांच्यासोबत हिमंता बिस्वा सरमा देखील उपस्थित होते, त्यानंतर त्यांचा भाजपमध्ये प्रवेश जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सुरु झाली. यानंतर संध्याकाळी हिमंता बिस्वा सरमा यांनी ३० ऑगस्ट रोजी रांचीमध्ये अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली.