...म्हणून झारखंड सरकार 'पाडले' नाही; महाराष्ट्रात येण्यापूर्वी राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले लिफाफ्याचे सीक्रेट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 11:37 AM2023-02-16T11:37:14+5:302023-02-16T11:40:26+5:30
झारखंडचे राज्यपाल रमेश बैस १७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात येणार आहेत आणि १८ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेणार आहेत.
रांची-
झारखंडचे राज्यपाल रमेश बैस १७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात येणार आहेत आणि १८ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्रात येण्याआधी झारखंड सरकारकडून त्यांना निरोप देण्यात आला. बुधवारी मुख्यमंत्री निवास परिसरात सरकारच्यावतीनं राज्यपाल रमेश बैस यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला. याआधी रमेश बैस यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. मुख्यमंत्री हेमंत सोरेन खूप चांगले नेते आहेत, पण सरकारच्या व्हिजनमध्ये कमतरता आहे, असं रमेश बैस म्हणाले.
राज्यात विकासकामे मोठ्या प्रमाणात झाली नाहीत. ते म्हणाले की झारखंडची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे येथील लोक खूप सरळ, साधे आणि छान आहेत. हेमंत सोरेन खूप तरुण वयात मुख्यमंत्री झाले. त्यांनी चांगलं काम करून आपला ठसा उमटवला पाहिजे, असं राज्यपाल म्हणाले. तसंच अधिक चांगल्या दिशेनं काम करण्याची सूचनाही त्यांनी केली. ते म्हणाले की, विधेयकातील त्रुटी आयएएसच्या सक्षमतेवर प्रश्न निर्माण करतात.
बंद लिफाफ्यानंतर सरकारचं वेगानं काम
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या ऑफिस ऑफ प्रॉफिट प्रकरणातही राज्यपाल रमेश बैस यांनी सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. ते म्हणाले की, "झारखंड सरकार पाडण्याची किंवा अस्थिर करण्याची माझी कोणतीही भावना किंवा हेतू नव्हता. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. संविधानाच्या कक्षेत राहून सर्व कामं केली. निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या पत्रावर निर्णय घेणे हा राज्यपालांचा अधिकार आहे. कोणाचीही तक्रार आल्यास त्याची राज्यपालांच्या अखत्यारीत चौकशी होऊ शकते". इतकंच नव्हे, तर योग्य वेळी आल्यावर निर्णय घेण्याचा विचार केला होता, असंही राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले की, हेमंत सरकारनं लिफाफा येण्याआधीच्या दोन वर्षात जे काम केलं त्यापेक्षा अधिक काम लिफाफा मिळाल्यानंतर करू लागलं होतं. त्यामुळे अशा स्थितीत राज्याच्या हिताचा निर्णय घेणं महत्वाचं वाटलं. रमेश बैस यांच्या या विधानानं अखेर त्यांनी हेमंत सोरेन सरकार पाडण्याचा विचार केला होता ही माहिती समोर आली आहे.
राज्यपालांना स्मृतीचिन्ह देवून निरोप
राज्यपालांच्या सन्मानार्थ मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राज्यपाल रमेश बैस यांना स्मृतीचिन्ह प्रदान केले. राज्यपाल रमेश बैस संविधान संरक्षक म्हणून सतत मार्गदर्शन करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल झारखंडच्या जनतेच्या वतीने त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा, असंही हेमंत सोरेन म्हमाले. सत्कार समारंभाला विधानसभा अध्यक्ष रवींद्रनाथ महतो उपस्थित होते. याशिवाय मंत्री जोबा मांझी, आलमगीर आलम, रामेश्वर ओराव, सत्यानंद भोक्ता, बन्ना गुप्ता आणि बादल उपस्थित होते. या सत्कार समारंभाला अनेक वरिष्ठ पोलीस-प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या पत्नी रमाबाई बैस याही उपस्थित होत्या, त्यांना मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला.