धक्कादायक! अंधश्रद्धेतून 4 जणांची बेदम मारहाण करून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 03:39 PM2019-07-21T15:39:13+5:302019-07-21T15:44:14+5:30
झारखंडच्या गुमला जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधश्रद्धेतून 4 जणांना बेदम मारहाण करून त्यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे.
गुमला - झारखंडच्या गुमला जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधश्रद्धेतून 4 जणांना बेदम मारहाण करून त्यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुमला जिल्ह्यातील सिसकारी गावात शनिवारी ही घटना घडली. 10 ते 12 लोकांनी चार लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढले आणि बेदम मारहाण केली. त्यानंतर गळा चिरून त्यांची हत्या करण्यात आली.
गुमलाचे एसपी अंजनी कुमार झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'प्राथमिकदृष्ट्या मिळालेल्या माहितीनुसार, ज्या लोकांची हत्या करण्यात आली आहे ते जादूटोणा करत होते. त्यामुळे अंधश्रद्धेतून या चौघांची हत्या झाली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.' तसेच चौघांची हत्या करण्यापूर्वी ग्रामस्थांनी एक बैठक बोलावली होती. या बैठकीत चार जणांवर जादूटोण्याचा आरोप करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.
Jharkhand: 4 persons killed allegedly by 10-12 unidentified miscreants in Gumla. Anjani Kumar Jha, SP Gumla, says, “Prima facie, it appears the victims were involved in witchcraft. Crime seems to have happened because of superstitious beliefs. Investigation underway.” (20.07.19) pic.twitter.com/L5RyrwWIkH
— ANI (@ANI) July 21, 2019
पोलिसांनी सर्व मृतदेह हे शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. 60 वर्षीय चापा उरांव, त्यांची पत्नी पीरा उराईन यांच्यासह गावातील इतर दोन लोकांची हत्या करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच झारखंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मारहाण आणि हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. गावातील अनेक घरांना टाळे लावून ग्रामस्थ बाहेर निघून गेले आहेत. त्यामुळे पोलीस सरपंचाकडे याप्रकरणाची चौकशी करत आहेत.
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, काठ्या आणि धारदार हत्यारं घेऊन काही लोक आले होते. त्यांनी तीन दरवाजे उघडायला लावले. त्यातील चार जणांना आपल्या ताब्यात घेतलं आणि त्या तीन घरांना टाळं लावलं. चारही जणांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर गळा चिरून त्यांची हत्या केली.
तबरेज अन्सारीच्या पत्नीला नोकरी देणार : वक्फ मंडळ
झारखंडमध्ये जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झालेल्या तबरेज अन्सारी याच्या पत्नीला दिल्ली वक्फ मंडळ पाच लाख रुपये आणि नोकरी देणार आहे. वक्फ मंडळाचे अध्यक्ष आणि आम आदमी पक्षाचे (आप) आमदार अमानतुल्लाह खान यांनी ही माहिती दिली होती. अन्सारी याने चोरी केल्याच्या संशयावरून जमावाने त्याला गेल्या 19 जून रोजी सेराई केला-खारसावान जिल्ह्यात पकडून खांबाला बांधले व जबर मारहाण केली. 22 जून रोजी त्याचा मृत्यू झाला होता.