झारखंडचे हेमंत सोरेन सरकार अलर्ट मोडवर; राजकीय भूकंपाचे संकेत, राजकीय हालचालींना वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 06:18 AM2022-08-20T06:18:43+5:302022-08-20T06:19:35+5:30
झारखंडमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. आगामी काही दिवस फार महत्त्वाचे आहेत.
एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क
रांची:झारखंडमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यातील राजकीय स्थिती पाहता आमदारांना राजधानीच्या परिसरातच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आगामी काही दिवसांत संभाव्य घटनाक्रमाशी जोडून याकडे पाहिले जात आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मतानुसार, आगामी काही दिवस फार महत्त्वाचे आहेत. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सत्तारूढ महागठबंधनच्या पक्षांची शनिवारी बैठक बोलावली आहे व सरकार अलर्ट मोडवर आले आहे.
काँग्रेसने आमदारांना २० तारखेपर्यंत राज्यात राहण्यास सांगितले आहे. तर दुसरीकडे झामुमो आमदारही संपर्कात आहेत. या घडामोडी सुरू असताना विधानसभा अध्यक्ष रवींद्रनाथ महतो व झामुमो आ. निरल पूर्ती यांनी त्यांचा कॅनडा दौरा रद्द केला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या कालावधीत आमदारांनी मांडलेल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलाविल्याची माहिती संसदीय कार्यमंत्र्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या नावे खाण लीज प्रकरणात आयोगाने सुनावणी पूर्ण केली आहे. आयोगाच्या निर्देशानुसार, या प्रकरणात भाजप नेता व मुख्यमंत्र्यांनी लिखित बाजू सादर केलेली आहे. आयोगाने निर्णय राखून ठेवला आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष
निवडणूक आयोग कधीही निर्णय देऊ शकते. आयोग आपल्या निर्णयाबाबत राज्यपालांना अवगत करील. त्याच्या आधारे राज्यपाल कारवाई करतील. विशेष म्हणजे भाजप नेत्यांच्या तक्रारीवरून राज्यपालांनी निवडणूक आयोगाकडून मत मागितले आहे. हेमंत सोरेन यांच्या नावे दगडी खाण लीजवर देण्याच्या आधारावर त्यांची सदस्यता रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर राज्यपालांनी हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे पाठविले आहे.