हेमंत सोरेन यांना 6 महिन्यांनंतर जामीन; पुन्हा झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 04:17 PM2024-07-03T16:17:55+5:302024-07-03T16:18:24+5:30
झारखंडमध्ये आज पक्षाची बैठक झाली, ज्यात हेमंत सोरेन यांच्या नावावर एकमत झाले.
Hemant Soren Jharkhand : मनी लाँड्रिंगप्रकरणी गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात असलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे (JMM) कार्याध्यक्ष हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना 28 जून रोजी जामीन मंजूर झाला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आता त्यांना परत एकदा राज्याचे मुख्यमंत्री केले जाण्याची शक्यता आहे. बुधवारी(दि.3) राज्यात इंडिया आघाडीची बैठक बोलावण्यात आली होती, ज्यामध्ये सोरेन यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यावर एकमत झाले. आता लवकरच ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली झालेली ही पहिलीच औपचारिक बैठक आहे. या बैठकीला सर्व आमदारांना येण्याचे निर्देश देण्यात आले होते. दरम्यान, झारखंडचे राज्यपाल सध्या राज्याबाहेर आहेत, त्यामुळे राज्यपाल रांचीला पोहोचेपर्यंत सर्व आमदार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राहतील. राज्यपाल सायंकाळी रांची येतील आणि त्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री चंपाई सोरेन आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांना नवी जबाबदारी दिली जाऊ शकते.
सीएम चंपाई सोरेन यांनी सर्व कार्यक्रम रद्द केले
हेमंत सोरेन मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना तेव्हा बळ मिळाले, जेव्हा मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी अखेरच्या क्षणी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून बैठकीला हजेरी लावली. सोरेन कालपासून त्यांच्या निवासस्थानी आहेत. त्यांना भेटायला आलेल्या लोकांना मुख्यमंत्र्यांची तब्येत खराब असल्याचा संदेश देऊन परत पाठवण्यात आले. विशेष म्हणजे, हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर, चंपाई सोरेन यांनी 2 फेब्रुवारी 2024 रोजी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.