CoronaVirus News: "४० तासांपासून स्मशानभूमीबाहेर रांगेत उभा आहे; पण वडिलांचे अंत्यसंस्कार होत नाहीएत"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 01:43 PM2021-04-12T13:43:42+5:302021-04-12T13:44:04+5:30
CoronaVirus News: कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; रुग्णालयांपाठोपाठ स्मशानभूमींच्या बाहेरदेखील रांगा
रांची: मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांमध्ये कोरोनानं अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. यानंतर आता देशाच्या इतर शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. झारखंडमध्ये कोरोना वेगानं हातपाय पसरत आहे. एका बाजूला उपचारांसाठी वैद्यकीय यंत्रणा अपुरी पडत असताना दुसऱ्या बाजूला अंत्यविधीसाठीही वेटिंग लागल्याचं भयावह चित्र काही भागांत दिसू लागलं आहे. त्यामुळे देशातल्या अनेक भागांत अतिशय भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
कुंभमेळ्यात लाखोंची गर्दी, कोरोना नियमांच्या चिंधड्या; अनेक साधू कोरोना पॉझिटिव्ह!
झारखंडची राजधानी रांचीमधील परिस्थिती अतिशय बिकट आहे. कब्रस्तानापासून स्मशानभूमीपर्यंत सगळीकडेच अंत्यसंस्कारासाठी अक्षरश: रांगा लागल्या आहेत. आपल्या आप्तस्वकियांच्या निधनामुळे शोकसागरात बुडालेले अनेकजण स्मशानभूमीच्या बाहेर उभे आहेत. रांचीतल्या एका मुलानं कोरोनामुळे वडील गमावले. वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुलगा तब्बल ४० तासांपासून रांगेत प्रतीक्षा करत आहे. मात्र अद्यापपर्यंत त्याला कोणतीही मदत मिळालेली नाही.
याला काय म्हणावं! नर्स राहिली बसून; अधिकाऱ्यानं सरपंचाला लस दिली टोचून
वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे झारखंडमधील आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर आहे. रुग्णालयाबाहेर बेडसाठी रांगा लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचं प्रमाणदेखील वाढलं आहे. मात्र मरणानंतरही त्रासातून सहजासहजी सुटका होत नाही. स्मशानभूमीबाहेर अंत्यविधीसाठी रांगा लागल्या आहेत. मृतांचे नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी रांगेत उभे आहेत. आपल्या आप्तेष्टांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांना कित्येक तास वाट पाहावी लागत आहे.
रविवारी रात्री हरमूतील स्मशान घाटावर एकूण १३ कोरोनाबाधितांचे मृतदेह आणले गेले. गॅसवर चालणाऱ्या दाहिनीवर मृतांचे अंत्यसंस्कार केले जात होते. मात्र तांत्रिक बिघाडामुळे अंत्यसंस्कार थांबवण्यात आले. त्यामुळे अनेकांना आपल्या जवळच्या व्यक्तींचे मृतदेह घेऊन स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराजवळ थांबावं लागलं. रात्री उशिरा जिल्हा प्रशासनानं घाघरा येथे नेऊन मृतदेहांवर अंत्यविधी केले.
कोरोनाबाधित वडिलांचा मृतदेह घेऊन आलेले रमेश तिर्की तब्बल ४० तास अंत्यविधी होण्याची वाट पाहात होते. मात्र त्यांना प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. मृतदेह घेऊन स्मशानभूमीजवळ पोहोचलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकांनादेखील यामुळे अडचणींचा सामना करावा लागला. उष्णता वाढत असताना त्यांना पीपीई किटमध्येच राहावं लागलं. मृतांच्या कुटुंबीयांसोबत अंत्यविधी पूर्ण करेपर्यंत त्यांना थांबून राहावं लागलं.