निष्काळजीपणा; इंजिनशिवाय धावू लागले ट्रेनचे डब्बे, सुदैवाने मोठा अपघात टळला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 02:06 PM2023-09-04T14:06:48+5:302023-09-04T14:06:58+5:30
Indian Railway: इंजिनशिवाय धावणारी ट्रेन पाहण्यासाठी स्टेशनवर मोठी गर्दी जमली.
साहिबगंज: झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. साहिबगंजमध्ये रेल्वेच्या काही बोगी(डब्बे) इंजिनशिवाय रुळांवर धावू लागले. सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही. ज्या रुळावरुन गाडी धावू लागली, त्या रुळावर दुसरी ट्रेन नव्हती, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती.
मिळालेल्या माहितीनुसार, साहिबगंजच्या बरहरवा रेल्वे स्टेशनच्या रेल्वे साइडिंग पॉईंटवरुन काही बोगी इंजिनशिवाय एक क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर पोहोचल्या. इंजिनविना धावणारी ट्रेन पाहण्यासाठी स्थानिकांनी स्टेशनवर गर्दी केली. या घटनेची माहिती स्टेशन मॅनेजरला समजताच त्यांनी तात्काळ रेल्वे कर्मचाऱ्यांसह एक नंबर प्लॅटफॉर्म गाठले आणि ट्रेनला हटवण्याची तयारी केली.
दरम्यान, एवढी मोठी चूक कशी झाली, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याप्रकरणी रेल्वेचा कोणताही कर्मचारी काहीही बोलण्यास तयार नाही. आता रेल्वे विभाग याप्रकरणी काय कारवाई करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी ओडिशात दोन ट्रेनची समोरासमोर मोठी टक्कर झाली होती. त्या घटनेत सूमारे 300 प्रशांना जीव गमवावा लागला होता.