तुफान राडा! रस्त्यात खासदार-आमदार एकमेकांना भिडले, पक्षातील वाद चव्हाट्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 10:05 AM2023-09-18T10:05:34+5:302023-09-18T10:06:59+5:30
एकाच पक्षाचे खासदार आणि आमदार एकमेकांना भिडले.
झारखंडमध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यातील संघर्ष दाखवणाऱ्या घ़टना समोर येत असतात. मात्र आता एकाच पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. झारखंडमधील साहिबगंजमध्ये एकाच पक्षाचे खासदार आणि आमदार एकमेकांना भिडले. ही बाब साहिबगंजच्या तीनपहारच्या बाकुंडीची आहे जिथे रस्त्याच्या पायाभरणी समारंभात JMM आमदार लोबिन हेम्ब्रम आणि JMM खासदार विजय हासदा समोरासमोर आले.
लोबिन हेम्ब्रम यांना रस्ता पायाभरणी कार्यक्रमाचं निमंत्रण नव्हतं. खासदार विजय हासदा यांच्यासमवेत रस्त्याची पायाभरणी सुरू असताना ही घटना घडली आहे. पायाभरणी समारंभाच्या वेळी आमदार लोबिन हेम्ब्रम साहिबगंजच्या तीनपहारमधील बाकुंडी येथे पोहोचले तेव्हा त्यांनी प्रथम आपला राग काढला आणि नंतर खासदारावर संतापले. खासदार आणि आमदार यांच्यातील बाचाबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये आमदार लोबिन हेम्ब्रम यांनी सर्वप्रथम रस्ता तयार करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, त्यांच्या विधानसभा मतदारसंघात रस्त्याची पायाभरणी होत असेल तर त्यांना कोणाच्या आदेशावरून बोलावण्यात आलं नाही? हे सर्व कोणाच्या सांगण्यावरून होत आहे? यावेळी ते विजय हासदा यांच्यावरही संतापले आणि तुम्हीही आम्हाला सांगितलं नाही. यासाठी आधी विभागाकडून मंजुरी घेऊ, त्यानंतरच पायाभरणीचे काम सुरू होईल.
यावेळी आमदारांनी पायाभरणी थांबवण्याचा प्रयत्न केला तर खासदारांनी पायाभरणीचे काम पुढे नेले. आमदार लोबिन हेम्ब्रम म्हणाले की, एकाच ठिकाणी नव्हे तर अनेक ठिकाणी त्यांना निमंत्रित न करता आणि कोणतीही माहिती न देता पायाभरणी केली जात आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, खासदारांनी आम्हाला शांत होण्यास सांगितले, मात्र आम्हीही खासदारांना गप्प राहण्यास सांगितले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.