लोको पायलटचा नोकरीच्या शेवटच्या दिवशी भीषण मृत्यू; कुटुंबाला दिलेले वचन राहिले अपूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 16:25 IST2025-04-02T16:13:47+5:302025-04-02T16:25:42+5:30
झारखंडमध्ये झालेल्या रेल्वे अपघात दोन लोको पायलटचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.

लोको पायलटचा नोकरीच्या शेवटच्या दिवशी भीषण मृत्यू; कुटुंबाला दिलेले वचन राहिले अपूर्ण
Jharkhand Rail Accident:झारखंडच्या साहेबगंज जिल्ह्यात मंगळवारी पहाटे दोन मालगाड्यांमध्ये झालेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला होता तर पाच जण जखमी झाले होते. एनटीपीसी या वीज कंपनीच्या दोन मालगाड्यांची मध्यरात्री तीन वाजता धडक बसली. ज्या ट्रॅकवर हा अपघात झाला तो देखील एनटीपीसीच्या मालकीचा आहे आणि त्याचा वापर कोळसा त्याच्या पॉवर प्लांटपर्यंत नेण्यासाठी केला जातो. हा अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर दोन्ही इंजिनांना आग लागली. या आगीत होपळून दोन्ही लोको पायलटचा मृत्यू झाला. यातील एका लोको पायलट त्याच दिवशी निवृत्त होणार होता. लोको पायलटच्या कुटुंबियांकडून निवृत्तीच्या कार्यक्रमाची तयारी सुरु असताना त्यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला.
झारखंडमध्ये कोळसा भरलेल्या मालगाड्यांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन चालक जिवंत जाळले. चालकासह ५ जण जखमी झाले आहेत. साहिबगंज जिल्ह्यातील बऱ्हेतमधील सोनजोरीजवळ ही घटना घडली. मालगाडीच्या चालकासह एकूण ५ जण गंभीररीत्या भाजले. जखमींवर सामुदायिक आरोग्य केंद्र, बारहेत येथे उपचार सुरू आहेत. दुसरीकडे, रेल्वेने या अपघातापासून स्वतःला दूर ठेवलं. या घटनेशी रेल्वेचा काहीही संबंध नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सोमवारी मध्यरात्री गोड्डा येथील लालमाटिया येथून कोळसा भरलेली मालगाडी पश्चिम बंगालमधील फरक्का एनटीपीसीकडे जात होती. तर बारहेत सोनजोडीजवळ लूप लाइनवर रिकामी मालगाडी उभी होती. लूप लाइनवर कोळसा भरलेली मालगाडी आली आणि उभ्या असलेल्या मालगाडीला थेट धडकली. ही धडक इतकी भीषण होती की मालगाडीच्या ५ वॅगन रुळावरून घसरल्या. मालगाडीच्या इंजिनला आग लागून रिकाम्या मालगाडीचे लोको पायलट अंबुज महतो आणि गंगेश्वर माल यांचा जागीच मृत्यू झाला.
अंबुज महतो हे झारखंडमधील बोकारो सेक्टर-९ मध्ये राहत होते. तर गंगेश्वर माल हे पश्चिम बंगालचे रहिवासी होते. दुसरीकडे, दुसऱ्या मालगाडीचा चालक जी.के.नाथ हेही गंभीर भाजले आहे. त्यांच्यासोबत असलेले मजूर उदय मंडल, इस्राउल शेख, जितेंद्र कुमार, रवी घोष आणि शाहिद हे देखील जखमी झाले. आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाला बोलवण्यात आले. अग्निशमन दलाने अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. या घटनेत रेल्वेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालं.
दुसरीकडे, एनटीपीसीचे लोको पायलट गंगेश्वर माल हे १ एप्रिल रोजी सेवानिवृत्त होणार होते. शेवटच्या दिवसाचे काम संपवून ते घरी जाणार होते. त्यांच्या कुटुंबाने गंगेश्वर यांच्या निवृत्तीच्या निमित्ताने रात्रीच्या जेवणाचे नियोजन केले होते. कुटुंबिय गंगेश्वर यांची वाट पाहत होते. गंगेश्वर यांनी घरी आल्यानंतर पत्नी, मुलगा आणि मुलीसोबत क्वालिटी टाइम घालवण्याचा प्लॅन केला होता. मात्र गंगेश्वर आणि त्यांच्या कुटुंबियाचे स्वप्न अर्धवटच राहिले.
"आम्हाला कळलं की बाबा सिग्नल पॉईंटवर थांबले होते. तेव्हा विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या मालगाडीचे इंजिन थेट त्यांच्या इंजिनाला धडकले. आता आमचं सगळं घर उद्धवस्त झालं आहे," अशी प्रतिक्रिया गंगेश्वर यांच्या मुलीने दिली.