जन्मापासून तोंड 'शिवलेले', 20 वर्षांपासून धान्याचा एक कणही खाल्ला नाही; असा राहिला जिवंत...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 01:50 PM2023-02-05T13:50:25+5:302023-02-05T13:51:21+5:30
झारखंडमधील एका तरुणाचे जन्मापासून तोंड बंद होते, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन त्याला नवजीवन दिले.
झारखंडमधील दुमका येथून एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. येथील एका 20 वर्षीय तरुणाला जन्मापासूनच आपले तोंड उघडता येत नव्हते. मात्र डॉक्टरांनी आता या तरुणावर शस्त्रक्रिया करुन त्याला नवजीवन दिले आहे. विशेष म्हणजे, जन्मापासूनच त्याला अन्नाचा एक कणही खाता येत नव्हता, पण आता तो आरामात अन्न खाऊ शकतो.
शीतपेयांवर जगत होता
20 वर्षीय रहम-उल-अन्सारी जन्मापासूनच टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉइंट अॅन्किलोसिस (Temporomandibular Joint Ankylosis) या गंभीर आजाराने ग्रस्त होता. या आजारामुळे तो जन्मापासून आजतागायत तोंड उघडू शकत नव्हता. तोंड पूर्णपणे बंद असल्यामुळे फक्त शीतपेयांवर जगत होता. आत्तापर्यंत रहम-उल-अन्सारीने धान्याचा एक दाणाही खाल्ला नव्हता.
20 वर्षानंतर तोंड उघडले
केवळ खाण्यातच नाही तर बोलण्यातही रुग्णाला खूप अडचणी येत होत्या. तसेच, रहिम-उलचा चेहराही खूप विद्रूप दिसत होता. रुग्णाचे नातेवाईक उपचारासाठी अनेक दिवस दवाखान्यात येत राहिले, मात्र आजाराचे गांभीर्य आणि शस्त्रक्रियेतील गुंतागुंतीमुळे रुग्णावर उपचार होऊ शकले नाहीत. दुसरीकडे, हेल्थ पॉइंट हॉस्पिटलमध्ये गुरुवारी रहीम-उलची शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यानंतर रुग्णाला 20 वर्षांनंतर तोंड उघडता आले.
कवटीच्या हाडापासून अलग केला जबडा
या प्रकरणात रहीम-उलची शस्त्रक्रिया करणारे डॉ. अनुज यांनी सांगितले की, फक्त टेम्पोरोमँडिब्युलर जॉइंट अॅन्किलोसिसची शस्त्रक्रियाच गुंतागुंतीची नाही, तर अशावेळी तोंड बंद पडल्यामुळे भूल देणेही खूप अवघड काम असते. अँकिलोसिसमुळे रुग्णाचा खालचा जबडा त्याच्या कवटीच्या दोन्ही बाजूंच्या हाडांशी पूर्णपणे जोडला गेला होता. सुमारे 5 तास चाललेल्या या ऑपरेशनमध्ये खालचा जबडा दोन्ही बाजूंच्या कवटीच्या हाडापासून वेगळा करण्यात आला आणि त्यानंतर चेहऱ्याची विकृतीही दुरुस्त करण्यात आली.