मदर तेरेसांच्या संस्थेवर नवजात अर्भकांच्या विक्रीचा आरोप, दोन नन्सना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 11:08 AM2018-07-06T11:08:14+5:302018-07-06T11:10:40+5:30
रांची येथे मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेवर नवजात अर्भकांची विक्री केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
रांची : रांची येथे मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेवर नवजात अर्भकांची विक्री केल्याचा आरोप करण्यात आला आहे. झारखंड सरकारने या आरोपांची दखल घेत याप्रकरणाची अधिक चौकशी सुरु केली आहे. तसेच पोलिसांनी याप्रकरणी दोन नन्ससह एका महिला कर्मचाऱ्याला अटक केली आहे.
कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी श्यामानंद मंडल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या कर्मचाऱ्यांनी एका जोडप्याला मूल विकलं होतं. पण काही दिवसांनी संस्थेने हे विकलेलं मूल पुन्हा आपल्या ताब्यात घेतलं. मात्र या मुलासाठी जोडप्याने तब्बल 1.20 लाख रुपये मोजले होते. त्यामुळेच फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी रांचीच्या बाल कल्याण समितीकडे मदर तेरेसांच्या संस्थेविरोधात तक्रार दाखल केली आणि हे धक्कादायक प्रकरण समोर आलं.
These nuns sold four babies- three in Jharkhand and one in UP. Further investigation is underway: Shyamanand Mandal,DSP Ranchi on two nuns of Missionaries of Charity arrested on charges of child trafficking #Jharkhandpic.twitter.com/DhAIwEbslj
— ANI (@ANI) July 5, 2018
पोलिसांनी याप्रकरणाची अधिक चौकशी केली असता, आणखी काही अर्भकांची विक्री करण्यात आल्याची बाब आता समोर आली आहे. यामध्ये तीन अर्भकांची झारखंडमध्ये तर एका अर्भकाची उत्तर प्रदेशमध्ये विक्री करण्यात आली आहे. याप्रकरणी एका महिला कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली असून अनिमा इंदवार असे अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. अनिमाने आतापर्यंत जवळपास सहा नवजात अर्भकांची विक्री केल्याचं कबूल केलं आहे.