धक्कादायक! मोफत ऑपरेशनच्या नावाखाली वृद्धाचा डोळा काढला अन् काचेची गोटी बसवली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 06:02 PM2022-10-09T18:02:40+5:302022-10-09T18:53:32+5:30
राज्याचे आरोग्यमंत्री बन्ना गुप्ता यांनी याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
झारखंडमध्येडॉक्टरांच्या हलगर्जीपणाचे अत्यंत गंभीर प्रकरण समोर आले आहे. वृद्धांची दृष्टी सुधारण्याच्या नावाखाली डॉक्टरांनी ऑपरेशन करून वृद्धाचा खरा डोळा काढला आणि काचेचा डोळा बसवल्याचा प्रकार घडला आहे. ऑपरेशननंतर काही दिवसांनी वृद्धाचे डोळे उघडले, तेव्हा त्याला काहीच दिसत नव्हते. ही बाब उघडकीस येताच वृद्धाचे ऑपरेशन करणारी महिला अंगणवाडी सेविका फरार झाली आहे. झारखंडचे आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण घाटशिला येथील उत्तर मौभंदर पंचायतीच्या किटाडीह गावचे आहे. गावातील रहिवासी गंगाधर सिंग (70) यांच्यासह एकूण आठ जणांना 18 नोव्हेंबर 2021 रोजी KCC नेत्र रूग्णालय जमशेदपूर येथे नेत्र शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. गावातील महिला अंगणवाडी सेविका सोमावारी माली हिनेच त्या सर्वांना रुग्णालयात नेले होते. ऑपरेशननंतर गंगाधर सिंग घरी परतले, पण त्यांचा उजवा डोळा दुखू लागला. दुखण्याच्या तक्रारीनंतर कुटुंबीयांनी रुग्णालयाशी संपर्क साधला. त्यानंतर गंगाधर सिंग यांच्यावर दोन महिने कुटुंबाविना रुग्णालयात उपचार केला.
डोळ्यात गोटी बसवली झाडली
दोन महिन्यानंतर गंगाधर सिंह पुन्हा घरी आले. गंगाधर सिंह यांच्या उजव्या डोळ्यात अचानक खाज येऊ लागली, म्हणून त्यांनी डोळा चोळला. डोळा चोळताना काचेची गोटी बाहेर आली. यानंतर गंगाधर सिंह घाटशीला येथील उपविभागीय रुग्णालयात तपासणीसाठी पोहोचले असता डोळा काढल्याचे समोर आले. ही बाब मीडियाच्या निदर्शनास आल्यानंतर ती हेडलाईन्स बनली. डोळ्यांच्या ऑपरेशनच्या नावाखाली डोळा काढल्याप्रकरणी गंगाधर यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केली.
आरोग्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले
हे प्रकरण गांभीर्याने घेत राज्याचे आरोग्यमंत्री बन्ना गुप्ता यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. मंत्री बन्ना गुप्ता म्हणाले की, हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. रुग्णालयाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. भविष्यात, ज्या रुग्णालयाचा सहभाग समोर येईल, त्या रुग्णालयाचा परवाना झारखंड क्लिनिक आस्थापना कायद्यांतर्गत रद्द केला जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल.